इच्छाशक्तीच्या ‘चाका’वर ध्येयाची आस!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 08:50 PM2018-09-11T20:50:44+5:302018-09-11T20:53:13+5:30

गोव्यात पहिल्यांदाच व्हिलचेअर बास्केटबॉल निवड चाचणी : दिव्यांग गोमंतकीयांना राष्ट्रीय स्पर्धेची संधी

The desire for the 'wheel' of willpower! | इच्छाशक्तीच्या ‘चाका’वर ध्येयाची आस!

इच्छाशक्तीच्या ‘चाका’वर ध्येयाची आस!

Next
ठळक मुद्देव्हीओसी स्टेडियम-तामिळनाडू येथे २० ते २३ सप्टेंबर दरम्यान पाचवी राष्ट्रीय व्हिलचेअर बास्केटबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत १९ राज्यांतील १९ पुरुष तर ८ महिलांचे संघ सहभागी होणार आहेत.

सचिन कोरडे : देशाकडून किंवा राज्याकडून खेळण्याची आस प्रत्येक खेळाडूची असते. गरज असते ती एका संधीची. अशीच संधी गोमंतकीय दिव्यांग खेळाडूंना चालून आली. व्हिलचेअरवर बास्केटबॉल खेळण्याचा कधी विचारही न केलेल्या गोमंतकीय खेळाडूंना संधी मिळाली ती गोव्यात पहिल्यांदाच झालेल्या व्हिलचेअर कार्यशाळा आणि निवड चाचणी शिबिरात. व्हिलचेअर बास्केटबॉल फेडरेशन आॅफ इंडियायांनी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी १० गोमंतकीय खेळाडूंची निवडही करण्यात आली. त्यामुळे इच्छाशक्तीच्या ‘चाका’वर ध्येयाची आस धरत या खेळाडूंना राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.


व्हीओसी स्टेडियम-तामिळनाडू येथे २० ते २३ सप्टेंबर दरम्यान पाचवी राष्ट्रीय व्हिलचेअर बास्केटबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत १९ राज्यांतील १९ पुरुष तर ८ महिलांचे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत पहिल्यांदाच गोव्याचा संघ सहभागी होईल. यासंदर्भात, फेडरेशनच्या महासचिव तामिळनाडूच्या कल्याणी राजारामन म्हणाल्या, की आम्ही पहिल्यांदाच गोव्यात आलो आहे. खेळाडूंचा उत्साह आणि त्यांच्यातील ध्येय बघता आम्हाला चांगले खेळाडू मिळतील, अशी अपेक्षा आहे. कार्यशाळेत एकूण १६ खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यात एका महिला खेळाडूचा समावेश आहे. आमच्या फेडरेशनला केवळ तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. असे असतानाही देशातून उत्कृष्ट खेळाडू मिळाले आहेत. दिव्यांग खेळाडूंना स्वत:ची क्षमता सिद्ध करता यावी, या उद्देशाने या खेळाची सुरुवात करण्यात आली आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे संघ पाठविले आहेत. बाली (थायलंड) येथे गेल्या वर्षी भारताच्या महिला व पुरुष संघाने तिसरे स्थान पटकाविले होते. सध्या ९ राज्यांत हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जात असून ५२० खेळाडू नोंदणीकृत आहेत. 

प्रशिक्षकांची गरज
हा खेळ ९० टक्के बास्केटबॉलसारखाच आहे. केवळ व्हिलचेअरवर दिव्यांग खेळाडूंना खेळावे लागते. ते इतके सोपे नाही. त्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते. पासिंग, शूटिंग, ड्रीमिंगचे कौशल्य विकसित करण्यासाठी खेळाडूंना मेहनत घ्यावी लागते. या खेळात दिव्यांगांना आपल्या शरीराच्या वरील भागाचा सर्वाधिक वापर करावा लागतो. त्यामुळे शारीरिक क्षमतेचा कस लागतो. व्हिलचेअर घेऊन वेगात धावणे, वेगवान हालचाली करणे आणि चेंडूवर नजर ठेवणे या कौशल्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते. भारतात हा खेळ नवीन असल्याने प्रशिक्षकांची गरज असल्याचे कल्याणी म्हणाल्या.
 

सरकार दरबारी मदतच...
आम्हाला आलेल्या आतापर्यंतच्या अनुभवात सरकार दिव्यांगांसाठी नेहमीच पुढाकार घेत आहे. तेलंगणा सरकारने फेडरेशनसाठी २० व्हिलचेअर्स पुरविल्या. एका व्हिलचेअरची किंमत ३५ हजार रुपये इतकी आहे. दिव्यांग खेळाडूंना ती स्वत: उपलब्ध करणे कठीण असते. गोव्यातही आम्ही क्रीडा सचिवांसोबत चर्चा केली. अशोक कुमार यांनी लगेच मैदान उपलब्ध करून दिले आणि व्हिलचेअरच्या प्रस्तावावर सकारात्मक उत्तर दिले. त्यामुळे गोव्यातून आम्हाला मदत मिळाली आहे, असेही राजारामन म्हणाल्या.


पंजाब, महाराष्ट्राचे वर्चस्व
सध्या या खेळात खेळाडूंची संख्या कमीच आहे. पोलिओग्रस्त खेळाडू बोटावर मोजण्याइतपत मिळतील. बरेच खेळाडू हे अपघातात आपले पाय गमावलेले दिसतील. आयुष्याला नव्याने सुरुवात करताना दिसतील. त्यांच्यातील आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवण्यासाठी या खेळाची खूप मदत होत आहे. सध्या पंजाब आणि महाराष्ट्रात सर्वाधिक खेळाडू आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर वर्चस्व मिळवले आहे. मोहाली, पुणे येथील खेळाडू राष्ट्रीय पातळीवर खेळत असल्याचे राजारामन म्हणाल्या.


व्हिलचेअरची मदत मिळाल्यास उत्तम
गोव्यात दिव्यांग खेळाडूंसाठी पहिल्यांदाच व्हिलचेअर बास्केटबॉलकार्यशाळा आयोजित करण्यात आली. फेडरेशनने ही एक मोठी संधी दिली आहे. मी तिरंदाज आणि जलतरणपटू म्हणून बºयाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांत गोव्याचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु, इतर खेळाडूंना तशी संधी मिळाली नाही. त्यामुळे या खेळातून त्यांना आंतरराष्ट्रीय संधी मिळेल. मात्र, या खेळासाठी व्हिलचेअरची गरज असते. त्यांची किंमतही अधिक आहे. गोवा सरकारने मदत केल्यास उत्तम होईल. राज्यात कौशल्यवान खेळाडू आहेत. गरज आहे ती त्यांना संधीची. या निमित्ताने त्यांना आपले कौशल्य आणि क्षमता सिद्ध करता येईल. दिव्यांग खेळाडूंसाठी सरकारने विशेष बजेट ठरवावे, असे मत आंतरराष्ट्रीय खेळाडू मंगेश कुट्टीकर याने व्यक्त केले.

Web Title: The desire for the 'wheel' of willpower!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा