Commonwealth Games 2018: काका पवारांना सोनेरी 'गुरुदक्षिणा'; राहुल आवारेने शब्द खरा करून दाखवला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 14:28 IST2018-04-12T14:27:30+5:302018-04-12T14:28:28+5:30
आपले गुरू दिवंगत हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार यांच्यासाठी गोल्ड कोस्ट इथल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचंय, अशी इच्छा त्यानं 'लोकमत'कडे व्यक्त केली होती.

Commonwealth Games 2018: काका पवारांना सोनेरी 'गुरुदक्षिणा'; राहुल आवारेने शब्द खरा करून दाखवला!
मुंबईः चित्त्याची चपळाई आणि तीक्ष्ण नजर लाभलेला महाराष्ट्राचा मल्ल राहुल आवारेनं आज राष्ट्रकुल सुवर्णपदकावर नाव कोरून आपला शब्द खरा करून दाखवला आहे. आपले गुरू दिवंगत हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार यांच्यासाठी गोल्ड कोस्ट इथल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचंय, अशी इच्छा त्यानं 'लोकमत'कडे व्यक्त केली होती. हे त्याचं स्वप्न साकार झालं आहे.
राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेच्या ५७ किलो वजनी गटात राहुल आवारेनं कॅनडाचा पैलवान स्टीव्हन ताकाहाशीचा १५-७ असा दणदणीत पराभव करून सोनेरी कामगिरी केली. महाराष्ट्राच्या मातीसाठी मी जिवात जीव असेपर्यंत खेळेन, असा निर्धार व्यक्त करणाऱ्या या मल्लाच्या ही 'सोनेरी गुरुदक्षिणा' नक्कीच प्रेरणादायी आहे. २०१० आणि २०१४ मध्ये राहुल आवारेवर अन्याय झाल्याने त्याला राष्ट्रकुल स्पर्धेत खेळता आले नव्हतं. पण, यावेळी त्याला राष्ट्रकुलची संधी मिळाली आणि तिचं त्यानं 'सोनं' केलं.
२००८ साली पुणे येथे युथ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण आणि तुर्की येथील ज्युनिअर जागतिक कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या बीड जिल्ह्यातील राहुल आवारे याने २०१० ते २०१७ दरम्यान राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सलग सुवर्णपदक जिंकले. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याने इंदूरला राष्ट्रीय स्पर्धेत जिंकलेल्या सुवर्णपदकाचा समावेश आहे. तसेच त्याने एकूण २७ आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांत १७ पदकांची लूट केली. डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाची कमाई केली. परंतु, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक त्याला खुणावत होतं. त्यासाठी सर्वस्व पणाला लावत तो पात्रता फेरीत लढला होता आणि जिंकला होता.
'आपले गुरू ध्यानचंद पुरस्कारप्राप्त हरिश्चंद्र बिराजदार आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त काका पवार यांचं ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न मला पूर्ण करायचंय. टप्प्याटप्प्याने मला मार्गक्रमण करायचे आहे. आता माझ्या गुरूंसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे', अशा भावना त्यानं 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केल्या होत्या. त्यानं आपलं हे ध्येय जिद्द आणि चिकाटीनं गाठलं आहे.
काका पवारांचं मोठं योगदान
राहुल आवारे हा त्याचे गुरू हरिश्चंद्र बिराजदार यांच्या निधनानंतर खचला होता. त्यातच २०१२ मध्ये त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली होती; परंतु गुरू काका पवार यांनी राहुल आवारे याच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागा केला होता. राहुलला सुवर्णपदक मिळाल्याचं कळताच काका पवारांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.