Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 13:15 IST2025-11-06T13:12:24+5:302025-11-06T13:15:47+5:30
Cristiano Ronaldo On Retirement: ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या फुटबॉलच्या कारकिर्दीच्या समाप्तीबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे.

Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
पोर्तुगीज फुटबॉलचा महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने लवकरच व्यावसायिक फुटबॉलमधून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. ४० वर्षीय या सुपरस्टारने ब्रिटिश पत्रकार पियर्स मॉर्गन यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्या भविष्यावर आणि फुटबॉलच्या कारकिर्दीच्या समाप्तीबद्दल अनेक महत्त्वपूर्ण भाष्य केले.
मुलाखतीत निवृत्तीबद्दल विचारले असता रोनाल्डो भावूक झाला. तो म्हणाला की, "मला वाटते की, मी त्यासाठी तयार आहे. परंतु, हा निर्णय घेणे खूप कठीण आहे. प्रत्येक गोष्टीची सुरुवात आणि शेवट असतो. आता मला स्वतःसाठी, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या मुलांना वेळ द्यायचा आहे."
१००० गोल करण्याचे स्वप्न
रोनाल्डोने २५-२६ वर्षांचा असल्यापासूनच भविष्याची तयारी सुरू केली होती. रोनाल्डोने निवृत्तीची कोणतीही विशिष्ट तारीख सांगितली नसली तरी, त्याचे कारकिर्दीत १००० गोल करण्याचे स्वप्न आहे. हे ध्येय साध्य झाल्यानंतरच तो निवृत्त होण्याची शक्यता आहे. क्लब आणि देशासाठी आतापर्यंत रोनाल्डोने ९५२ गोल केले आहेत. म्हणजेच त्याचे हे महत्त्वाचे ध्येय आता फार दूर नाही.
विश्वचषक आणि इतिहासातील 'सर्वोत्तम' खेळाडू
रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत पाच विश्वचषक खेळले आहेत. परंतु, अजूनही त्याला ते जेतेपद जिंकण्याची आकांक्षा आहे. मात्र, त्याने केवळ विश्वचषक जिंकल्याने खेळाडू इतिहासातील सर्वोत्तम ठरत नाही, यावर प्रश्न उपस्थित केला. "केवळ सहा किंवा सात सामने जिंकून एखाद्याला सर्वोत्तम म्हणता येईल का? ते योग्य आहे का?" असेही तो म्हणाला.