महिलांमुळे क्रिकेटपटू नेहमीच चर्चेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2015 22:19 IST2015-10-28T22:19:22+5:302015-10-28T22:19:22+5:30
सभ्य माणसांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये कुठला ना कुठला वाद नेहमी या खेळाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवितो.

महिलांमुळे क्रिकेटपटू नेहमीच चर्चेत!
नवी दिल्ली : सभ्य माणसांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये कुठला ना कुठला वाद नेहमी या खेळाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवितो. महिलांसोबतच्या वादामुळे क्रिकेटपटू अडचणीत येत असल्याच्या घटना नव्या नाहीत. या घटना सातत्याने वाढतच आहेत. अलीकडचे उदाहरण म्हणजे लेगस्पिनर अमित मिश्रा याच्याविरुद्ध एका महिलेने नोंदविलेली तक्रार. महिलेला कथित मारहाण आणि विनयभंग यामुळे मिश्रावर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
अमित मिश्रासोबत झालेला वाद सामान्य मानावा की मग वारंवार होणाऱ्या अशा घटनांना मुद्दाम हवा दिली जाते, या निष्कर्षाप्रत यायला वाव आहे.
हे थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना का होत नाहीत? देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूंवरील आरोपात सत्य असते, की मग वैयक्तिक मतभेदांमुळे त्यांना अशा प्रकारच्या संवेदनशील प्रकरणात ओढले जाते? जे काही असेल पण अखेर नुकसान होते ते क्रिकेटचेच! मिश्रासोबतची घटना वादाचा केंद्रबिंदू राहिलेल्या प्रकाशझोतातील क्रिकेटपटूंच्या यादीतील एक ‘किस्सा’ आहे. आॅस्ट्रेलियाचा दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्न किंवा बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेन यांच्यासोबत महिलांशी जुळलेला वाद या खेळाडूंना काही काळ प्रसिद्धीच्या झोतात ठेवणारा ठरला.
हुसेनवर नुकत्याच झालेल्या विश्वचषकापूर्वी त्याची पे्रयसी असलेल्या अभिनेत्रीने व्यभिचार केल्याचा आरोप लावला. या आरोपांमुळे हुसेनचे विश्वचषकात खेळणे संशयास्पद होते. त्याला अटकही झाली. पण नंतर राष्ट्रहित डोळ्यापुढे ठेवून त्याला जामीन देण्यात आला. १९ वर्षांचा हुसेन संघात सहभागी झाला; शिवाय इंग्लंडविरुद्ध ‘मॅचविनर’ म्हणून पुढे आला. पुढे त्या अभिनेत्रीने नाट्यमयरीत्या हुसेनवरील सर्व आरोप मागे घेतले.
शेन वॉर्नची तर वादाशी जवळीक होती. २००३ मध्ये कारकिर्दीच्या उच्च शिखरावर असताना द. आफ्रिकेतील महिलेने वॉर्नवर फोनवर अश्लील संभाषण केल्याचा आरोप लावला होता. चौकशीअंती त्याच्यावर वर्षभराची बंदी लावण्यात आली.
वादग्रस्त क्रिकेटपटू व त्यांच्या पत्नी...
विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीने घरच्या मोलकरणीला मारहाण केल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. स्वत:ला मारहाण करीत खोलीत डांबल्याचा आरोप या मोलकरणीने कांबळी दाम्पत्यावर केला होता.
विंडीजचा अष्टपैलू खेळाडू रेयॉन हिन्डस् याने २०१२ मध्ये २८ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरण पुढे आले. त्याला अटकही झाली. नंतर महिलेने आरोप खोटे असल्याचे सांगताच हिन्डस्ला सोडण्यात आले.
आॅस्ट्रेलियाचे प्रथमश्रेणी क्रिकेटपटू आणि स्तंभलेखक पीटर रिबॉक यांच्यावरदेखील बलात्काराचे आरोप लागले होते. त्यातून वाचण्यासाठी त्यांनी आत्महत्येचा मार्ग पसंत केला.