Commonwealth Games 2018 : भारतीय खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यास सज्ज, राष्ट्रकुल स्पर्धेस आजपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 02:13 AM2018-04-04T02:13:11+5:302018-04-04T05:53:51+5:30

सिरिंज वादानंतरही उंचावलेल्या मनोधैर्यासह भारतीय पथक बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. दरम्यान, स्पर्धेला प्रारंभ होण्यास केवळ एक दिवसाचा वेळ शिल्लक आहे, पण गोल्ड कोस्ट शहरात मात्र अद्याप विशेष उत्साह दिसून येत नाही.

Commonwealth Games 2018: Indian players are ready for the best performance | Commonwealth Games 2018 : भारतीय खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यास सज्ज, राष्ट्रकुल स्पर्धेस आजपासून प्रारंभ

Commonwealth Games 2018 : भारतीय खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यास सज्ज, राष्ट्रकुल स्पर्धेस आजपासून प्रारंभ

googlenewsNext

गोल्ड कोस्ट - सिरिंज वादानंतरही उंचावलेल्या मनोधैर्यासह भारतीय पथक बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. दरम्यान, स्पर्धेला प्रारंभ होण्यास केवळ एक दिवसाचा वेळ शिल्लक आहे, पण गोल्ड कोस्ट शहरात मात्र अद्याप विशेष उत्साह दिसून येत नाही.
शहरात ७१ राष्ट्रकुल देश स्पर्धेत सहभागी होत असल्याचे साईनबोर्ड लागलेले आहेत, पण चार वर्षांनंतर होणाºया या स्पर्धेचे यजमानपद भूषविणाºया शहरांमध्ये यापूर्वीही जसा उत्साह दिसला, तसा येथे दिसला नाही.
आयोजक अद्यापही या सुंदर शहरातील नागरिकांना तिकीट विकत घेण्याचे आवाहन करीत आहेत. कारण अनेक खेळांची तिकिटे विकल्या गेलेली नाहीत. खेळ आयोजन समितीचे सीईओ मार्क पीटर्स म्हणाले, ‘जा आणि तिकिटे विकत घ्या. जीवनात एकदाच मिळणारा हा अनुभव आहे. ही संधी गमावू नका.’ पीटर्स पुढे म्हणाले, ‘सर्व तिकिटे विकली जावीत, असे आम्हाला वाटते. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ९५ टक्के तिकिटे विकल्या जातील, असा विश्वास असून एकूण १२ लाख तिकिटांची विक्री झाली आहे.’ भारतासाठी सिरिंज वाद रंगाचा बेरंग करणारा ठरला आहे. (वृत्तसंस्था)

खेळाडूंवर अपेक्षांचे ओझे

भारताच्या ध्वजारोहण समारंभात खेळाडूंचे मनोधैर्य उंचावलेले दिसले. या स्पर्धेत आपल्या कामगिरीवर सिरिंज वादाचे सावट दिसणार नाही, असा निर्धार खेळाडूंच्या देहबोलीवरून झळकत होता. भारतीय पथकातील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, ‘जे काही घडले ते मूर्खपणाचे होते. त्यात काही अवैध नव्हते.’
ग्लास्गोमध्ये यापूर्वी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने १५ सुवर्ण, ३० रौप्य व १९ कांस्य पदकांसह एकूण ६४ पदके पटकाविली होती. यावेळी २१८ सदस्यांच्या पथकाकडून सर्वोत्तम कामगिरीची आशा आहे.
अपेक्षांचे ओझे नेमबाज, बॉक्सर्स, बॅडमिंटनपटू आणि मल्लांवर राहणार आहे. दोन्ही हॉकी संघांकडूनही पदकाची आशा आहे. पी.व्ही. सिंधू, जितू राय, सायना नेहवाल, एम.सी. मेरीकोम, सुशील कुमार आणि विनेश फोगाट यांच्याकडून पदकांची आशा आहे. जिम्नॅस्ट व टेबल टेनिसपटूही धक्कादायक निकाल नोंदवण्यास सक्षम आहेत.
या स्पर्धेत जमैकाचा धावपटू योहान ब्लॅक, अडथळा शर्यतीतील विश्व चॅम्पियन धावपटू सैली पीयरसन, ब्रिटनचा जलतरणपटू टॉम डाले व दक्षिण आफ्रिकेची कास्टर सेमेन्या यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होत आहेत.
स्पर्धा ५ एप्रिलला सुरू होणार असून उद््घाटन बुधवारी होईल. भारताला पहिल्याच दिवशी पदक जिंकण्याची संधी आहे. विश्व चॅम्पियन भारोत्तोलक मीराबाई चानूकडून पदकाची आशा आहे. याच दिवशी बॅडमिंटनपटू, बॉक्सर्स व टेबल टेनिसपटू आपल्या मोहिमेला सुरुवात करतील.

सिरिंज वादामध्ये भारतीय डॉक्टरला ताकीद...

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग पथकाला दिलासा देताना सिरिंज वादामध्ये डॉक्टर अमोल पाटील यांना मोठी शिक्षा न देता केवळ ताकीद देऊन सोडले. डॉक्टर पाटील यांनी निर्धारित प्रक्रियेचे पालन न करता सिरिंज नष्ट न करण्याची चूक केली.
राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने सीजीएफ न्यायालयाच्या सुनावणीनंतर स्पष्ट केले की,‘राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या न्यायालयाने डॉक्टर अमोल पाटील यांच्याविरुद्ध सीजीएफ वैद्यकीय आयोगाच्या तक्रारीनंतर सुनावणी केली. त्यांच्यावर खेळाच्या ‘नो नीडल पॉलिसी’चे उल्लंघन केल्याचा आरोप होता.’
पाटील यांनी थकलेल्या खेळाडूंना इंजेक्शनद्वारे बी कॉम्प्लेक्स दिले होते. सीजीएफने स्पष्ट केले की,‘नो नीडल पॉलिसीअंतर्गत सुई एका निर्धारित स्थानी गोळा कराव्या लागतात. तेथे केवळ सीजीए पथकातील अधिकृत वैद्यकीय कर्मचारी पोहोचू शकतात. पॉलिक्लिनिकचा दोनदा दौरा होईपर्यंत या नीडल्स नष्ट करण्यात आल्या नव्हत्या. नियमाचे उल्लंघन करणाºया डॉक्टरला सीजीएफने लिखित स्वरूपात कठोर शब्दात ताकीद द्यायला हवी होती, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याची एक प्रत भारतीय पथकाच्या प्रमुुखांना द्यायला हवी. त्यात भारतीय पथकातील कुणा सदस्याकडून भविष्यात सीजीएफच्या कुठल्याही नीतीचे उल्लंघन व्हायला नको, असेही त्यात नमूद करायला हवे होते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
सीजीएफने संबंधित राष्ट्रीय संघाच्या खेळाडूचे नाव घेतले नव्हते, पण हा देश भारतच असेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. सिरिंज मिळाल्यानंतर करण्यात आलेल्या डोप चाचणी निगेटिव्ह आल्या.
सीजीएफने म्हटले की,‘चौकशीदरम्यान डॉक्टरने नो नीडल पॉलिसीची माहिती असल्याचे कबूल केले. त्यांनी १९ मार्चपासून आतापर्यंत वापरलेल्या नीडल्सची माहिती दिली आणि चौकशीला सहकार्य केले.’
सीजीएफने स्पष्ट केले की,‘सीजीएफ न्यायालयाला नो नीडल पॉलिसीच्या कलम एक व दोनचे उल्लंघन झाले असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी नीडल्स रुममध्ये ठेवायला हव्या होत्या. पण त्या फेकण्यासाठी ते शार्पबिन मागण्यासाठी ते पॉलिक्लिनिकमध्ये गेले. भारतीय पथकासोबत अधिक डॉक्टर्स नाहीत, या मुद्याचा सीजीएफने विचार केला. भारतीय पथकात ३२७ सदस्य आहेत तर केवळ एक डॉक्टर व एक फिजिओ आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Commonwealth Games 2018: Indian players are ready for the best performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.