प्रो कबड्डी : बेंगाल वॉरियर्स संघाची विजयी कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 06:17 IST2019-07-25T04:24:23+5:302019-07-25T06:17:20+5:30

यूपी योद्धाचा ४८-१७ असा पराभव

Bengal Warriors team's winning performance | प्रो कबड्डी : बेंगाल वॉरियर्स संघाची विजयी कामगिरी

प्रो कबड्डी : बेंगाल वॉरियर्स संघाची विजयी कामगिरी

हैदराबाद : एकतर्फी झालेल्या सामन्यात आक्रमक खेळ केलेल्या बेंगाल वॉरियर्सने प्रो कबड्डी लीगच्या सातव्या सत्रात विजयी सलामी देताना यूपी योद्धाचा ४८-१७ असा धुव्वा उडवला. मोहम्मद नबिबक्ष, मनिंदर सिंग आणि के. प्रपंजन या आक्रमकांसह बलदेव सिंग आणि रिंकू नरवाल या बचावपटूंनी केलेल्या तुफानी खेळाच्या जोरावर बेंगालने सहज बाजी मारली.

गचिबावली स्टेडियमवर बेंगालच्या वेगवान खेळापुढे यूपी संघाला आपला खेळ करण्याची संधीच मिळाली नाही. तब्बल ४ वेळा यूपी संघावर लोण चढवून बेंगालने आपला दबदबा राखताना यूपी संघावर अखेरपर्यंत दडपण राखले. पहिल्या तीन मिनिटांमध्ये जबरदस्त सुरुवात करत यूपीने ४-० अशी आघाडी मिळवली. मात्र नंतर बेंगालने मुसंडी मारत ६-६ अशी बरोबरी साधली. १३व्या मिनीटाला बेंगालने यूपीवर पहिला लोण चढवून ११-७ अशी पकड मिळवली आणि येथून नंतर बेंगालने मागे वळून पाहिले नाही.

मध्यंतराला बेंगालने १७-९ अशी आघाडी घेत मजबूत पकड मिळवली. नबीबक्षने खोलवर चढाया करत सर्वाधिक १० गुण मिळवत यूपी संघाची हवा काढली. मनिंनदनेही त्याला चांगली साथ देत ९ गुण मिळवले. प्रपंजननेही आक्रमणात ४ गुण मिळवले. बलदेव आणि रिंकू यांनी भक्कम पकडी करताना अनुक्रमे ७ आणि ४ गुण वसूल केले. यूपीकडून मनू गोयत याने ६ गुणांसह एकाकी झुंज दिली.

Web Title: Bengal Warriors team's winning performance