जोकोविच, सिनेर वेगवेगळ्या ड्रॉमध्ये; भारताचा सुमित थॉमसला देणार टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 11:39 IST2025-01-10T11:36:55+5:302025-01-10T11:39:10+5:30
जोकोविच वर्सेस कार्लोस अल्काराझ यांच्यात रंगू शकते सेमीची लढत

जोकोविच, सिनेर वेगवेगळ्या ड्रॉमध्ये; भारताचा सुमित थॉमसला देणार टक्कर
मेलबर्न : गतविजेता यानिक सिनेर आणि सर्बियाचा दिग्गज नोव्हाक जोकोविच यांना रविवारपासून रंगणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनटेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत वेगवेगळ्या ड्रॉमध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे यंदा ते एकमेकांविरुद्ध उपांत्य सामन्यात भिडणार नाहीत. गेल्या वर्षी सिनेरने उपांत्य सामन्यात जोकोविचला नमवले होते.
जोकोविच वर्सेस कार्लोस अल्काराझ यांच्यात रंगू शकते सेमीची लढत
अव्वल मानांकित सिनेर सलामीला निकोलस जारीविरुद्ध खेळेल. त्याच्या गटात टेलर फ्रिट्झ, बेन शेल्टन आणि दानिल मेदवेदेव या अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे. त्यामुळे सिनेरला प्रत्येक सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. जोकोविच व स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराझ यांचा सामना उपांत्यपूर्व फेरीत होऊ शकतो. महिलांमध्ये सबालेंका सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. याआधी मार्टिना हिंगीसने १९९७-१९९९ दरम्यान असा पराक्रम केला होता.
नागलचा सामना माचाकविरुद्ध
भारताचा आघाडीचा टेनिसपटू सुमित नागल याचा सलामीचा सामना झेक प्रजासत्ताकच्या थॉमस माचाकविरुद्ध होईल. नागल सध्या एटीपी क्रमवारीत ९६व्या स्थानी आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत नागलने सलामीला २७व्या मानांकित कझाकस्तानच्या अलेक्झेंडर बुबलिक याला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र, पुढील फेरीत त्याला चीनच्या जुनचेंग शांगविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.