आशियाई ज्यु. टेबल टेनिस स्पर्धा मुंबईत
By Admin | Updated: September 11, 2014 01:47 IST2014-09-11T01:47:20+5:302014-09-11T01:47:20+5:30
भारतातील टेबल टेनिसला एक वेगळी उंची गाठून देण्यासाठी मुंबई शहर जिल्हा संघटनेच्या (एमसीडीटीटी) गेल्या अनेक वर्षांपासून चाललेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे

आशियाई ज्यु. टेबल टेनिस स्पर्धा मुंबईत
मुंबई : भारतातील टेबल टेनिसला एक वेगळी उंची गाठून देण्यासाठी मुंबई शहर जिल्हा संघटनेच्या (एमसीडीटीटी) गेल्या अनेक वर्षांपासून चाललेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. त्याचे फलित म्हणजे २०व्या रिलायन्स आशियाई ज्युनिअर आणि कॅडेट टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनाचा मान मुंबईला मिळाला आहे. प्रो कबड्डीसारख्या मेगा इव्हेंटचे यशस्वी आयोजन केल्यानंतर एनएससीआय स्टेडियममध्येच १२ ते १६ सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. जवळपास १६ देशांतील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला असून, अव्वल पाच संघांना नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये होणाऱ्या विश्व ज्युनिअर अजिंक्यपद स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू चिनी आव्हान परतवून या सुवर्णसंधीचा फायदा उचलण्यासाठी प्रयत्नशील असतील.
मुंबईत बुधवारी आयोजित एका कार्यक्रमात या स्पर्धेची घोषणा करण्यात आली.ही स्पर्धा आशियाई टेबल टेनिस युनियन, टेबल टेनिस फेडरेशन आॅफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली आहे. माजी टेबल टेनिसपटू फारूक खोडाईजी (१९६७), केटी खोडाईजी (१९७१), कमलेश मेहता (१९८५), मोनालिसा मेहता (१९८७) आणि एऩ आऱ बजाज (१९७३) या आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत भारतासह चीन, जपान, कोरिया, सिंगापूर, चायनीज तायपै, थायलंड, जॉर्डन, कजाकस्तान, इराण, हाँगकाँग आणि कतार आदी देशांचा समावेश आहे. (क्रीडा प्रतिनिधी)