Asian Games 2018: कोल्हापूरच्या मातीतील कमळ... राही सरनोबत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 16:46 IST2018-08-22T16:25:51+5:302018-08-22T16:46:16+5:30
कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या २७ वर्षीय राहीने अंतिम फेरीत दिलेली कडवी झुंज पाहताना काळीज वर खाली होत होते. पण सुवर्णपदकाच्या इतक्या जवळ येऊन माघारी परतणे हे राहीला मान्य नव्हते. अखेरपर्यंत ती लढली आणि विजयाने तिला मुजरा केला.

Asian Games 2018: कोल्हापूरच्या मातीतील कमळ... राही सरनोबत
स्वदेश घाणेकर : राही सरनोबतने आज संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचावली. २५ मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्या २७ वर्षीय राहीने अंतिम फेरीत दिलेली कडवी झुंज पाहताना काळीज वर खाली होत होते. पण सुवर्णपदकाच्या इतक्या जवळ येऊन माघारी परतणे हे राहीला मान्य नव्हते. अखेरपर्यंत ती लढली आणि विजयाने तिला मुजरा केला.
शाहु महाराजांच्या कर्मभूमी कोल्हापूरात जन्मलेली राही.. तिचा हा प्रवास २००८ पासून पाहण्याची संधी मिळाली. पुण्यात झालेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिने पहिले सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्राची दिग्गज नेमबाज तेजस्विनी सावंत ही तिची प्रेरणास्थान.. तिच्याकडून प्रेरणा घेत राहिने यशोशिखर सर केले. विश्वचषक स्पर्धेत पिस्तुल प्रकारात सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय... त्यामुळेच तिला Goldan Girl असे संबोधले जाऊ लागले.
यशाचे शिखर सर करताना तिचे पाय नेहमी जमीनीवर राहिले.. वडील जीवन यांच्याकडून त्यांना हा समजुतदार पणा मिळालेला असावा. कितीही यशस्वी झालात तरी आपण जे होतो ते विसरू नये, असे तिच्या वडीलांनी एका भेटीदरम्यान सांगितले होते. उजव्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर बराच काळ ती अद्यातात होती... अनेकांनीराहिची कारकीर्द संपली असा दावा केला.. पण आज पुन्हा तिने ते दावे फोल ठरवले..
कोल्हापूरच्या रांगड्या मातीत दृढ निश्चियाने फुललेले हे कमळ आहे तो इतक्या सहजासहजी कोमेजणारा नाही.. याची प्रचिती तिने जकार्तात झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून पुन्हा दिली. महाराष्ट्राच्या या कन्येचा आज सर्व भारतीयांना सार्थ अभिमान वाटत आहे.