Asian Games 2018: आई-बाबांची शान, देशाचा अभिमान; व्हिडीओ कॉल करून 'तिनं' कुटुंबाला दाखवलं सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 13:44 IST2018-08-31T13:44:10+5:302018-08-31T13:44:28+5:30
Asian Games 2018: भारतीय महिला रिले संघाने 4 बाय 400 मीटर शर्यतीत विक्रमी सलग पाचवे सुवर्णपदक पटकावले.

Asian Games 2018: आई-बाबांची शान, देशाचा अभिमान; व्हिडीओ कॉल करून 'तिनं' कुटुंबाला दाखवलं सुवर्णपदक
जकार्ता, आशियाई क्रीडा स्पर्धाः भारतीय महिला रिले संघाने 4 बाय 400 मीटर शर्यतीत विक्रमी सलग पाचवे सुवर्णपदक पटकावले. हिमा दास, एम आर पुवम्मा, सरिताबेन गायकवाड आणि विस्मया वेल्लूवा कोरोथ यांचा समावेश असलेल्या 4 बाय 400 मीटर रिले संघाने 3 मिनिटे 28.72 सेकंदाच्या वेळेसह सुवर्णपदक नावावर केले. केरळच्या 21 वर्षीय विस्मयाचे आशियाई स्पर्धेतील हे पहिलेच पदक असल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झालेला. हे पदक कधी एकदा आपल्या घरच्यांना दाखवते असे तिला झाले होते. तिने पदक वितरण सोहळ्यानंतर त्वरित आपल्या घरच्यांना व्हिडीओ कॉल केला.
विस्मयाने नुसत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. त्याशिवाय राष्ट्रीय आंतरविद्यापीठ स्पर्धेचे रौप्यही तिच्या नावावर आहे. पण, विस्मयाला अॅथलेटिक्स बनण्यात कोणताही रस नव्हता.
बांधकाम मजुराची मुलगी असलेल्या विस्मयाने शिक्षणाला प्राधान्य दिले. तिने 12 वीतही A+ मार्क मिळवले आहेत आणि BSc Mathematics ची डिग्रीही घेतली आहे. आंतरशालेय आणि कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत तिने सहभाग घेतला होता. पण, भविष्यात धावपटू होऊ असा विचार तिने कधीच केला नव्हता.
सोव्हियत युनियनची माजी धावपटू गॅलिना बुखारिना यांनी विस्मयावर विश्वास दाखवला. बुखारिना यांच्यामुळे विस्मया जकार्तात दाखल झाली.
आंतरराज्य अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत 53.30 अशी निराशाजनक कामगिरी करूनही बुखारिनाने तिला संघात स्थान सहभागी करून घेतले. बुखारिना यांनी दाखवलेल्या विश्वासाला विस्मयानेही तडा जाऊ दिला नाही.