आशियाई मुष्टियुद्ध : अमित, लवलिना यांचे कांस्यपदकावर समाधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 06:37 IST2020-03-11T05:12:49+5:302020-03-11T06:37:38+5:30
पहिल्यांदाच मिळवले ऑलिम्पिक तिकीट

आशियाई मुष्टियुद्ध : अमित, लवलिना यांचे कांस्यपदकावर समाधान
अम्मन : जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला भारताचा स्टार मुष्टियोद्धा अमित पंघाल याला ५२ किलो गटाच्या उपांत्य फेरीत अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागले. यामुळे त्याला आशियाई आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी, महिलांमध्ये लवलिना बोरगोहेन हिलाही उपांत्य फेरीत पराभव झाल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
उपांत्य फेरीत दोघांचा पराभव झालेला असला तरी त्यांनी या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठत पहिल्यांदाच आॅलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित केलेले आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या लढतीत जागतिक रौप्य विजेत्या आणि स्पर्धेत अग्रमानांकन असलेल्या अमितला चीनच्या जियांगौन हू याच्याविरुद्ध २-३ असा पराभव पत्करावा लागला. हा विजय हूसाठी एक प्रकारे वचपाच होता. कारण गेल्या वर्षी अमितने आशियाई उपांत्य फेरीत आॅलिम्पिक आणि जागतिक कांस्यपदक विजेत्या हू याला पराभवाचा धक्का दिला होता.
उपांत्य फेरीपर्यंत धडाकेबाज खेळ केलेल्या अमितला मंगळवारी हूविरुद्ध आपल्या लौकिकास साजेसा खेळ करण्यात यश आले नाही. मोक्याच्या वेळी निर्णायक प्रत्युत्तर देण्यात आलेल्या अपयशामुळे अखेर त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
दुसरीकडे, दोन वेळची जागतिक कांस्यपदक विजेती आणि स्पर्धेतील दुसरी मानांकित बोरगोहेनला चीनच्या हाँग गुविरुद्ध ०-५ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. स्पर्धेतील तिसरी मानांकित आणि २०१८ साली जागतिक रौप्यपदक जिंकलेल्या हाँगने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना बोरगोहेनला आपला खेळ करण्याची एकही संधी दिली नाही.
बोरगोहेनने सामन्यात पुनरागमनाचा अनेकदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र हाँगच्या धडाक्यापुढे तिला बाजी मारण्यात यश आले नाही. अंतिम फेरी गाठलेल्या हाँगला आता सुवर्णपदकासाठी विश्वविजेत्या आणि स्पर्धेतील अग्रमानांकित तैवानच्या चेन नियेन चीनविरुद्ध भिडावे लागेल.
विकास अंतिम फेरीत
विकास कृष्णनने ६९ किलो गटातून अंतिम फेरीत धडक दिली आहे. डाव्या भुवईच्या खाली दुखापत झाल्यानंतरही विकासने कजाखस्तानच्या अब्लाइखान जुसुपोव याला पराभूत केले. सुवर्ण पदकासाठी विकास जॉर्डनच्या एशेह हुसैनविरुद्ध लढणार असून एशेहने आशियाई सुवर्ण विजेत्या आणि अग्रमानांकीत बोबो उस्मान बातुरोव याला नमविले.