कडव्या झुंजीनंतर सातवा डाव बरोबरीत
By Admin | Updated: November 18, 2014 00:59 IST2014-11-18T00:59:51+5:302014-11-18T00:59:51+5:30
विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत आज काळ्या मोहरीने खेळत असलेल्या भारताच्या विश्वनाथन आनंद १२२ चालींपर्यंत कार्लसनला झुंज देत डाव बरोबरीत सोडविला.

कडव्या झुंजीनंतर सातवा डाव बरोबरीत
जयंत गोखले,
विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत आज काळ्या मोहरीने खेळत असलेल्या भारताच्या विश्वनाथन आनंद १२२ चालींपर्यंत कार्लसनला झुंज देत डाव बरोबरीत सोडविला.
७ व्या फेरी अखेर कार्लसन ४ गुणांवर तर आनंद ३ गुणांवर आहे. उद्या आनंद पांढऱ्या मोहोऱ्यांनी खेळणार आहे.
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील ७ वा डाव आज कार्लसनने राजाच्या पुढील प्यादे २ घरे सरकवून सुरू केला. आनंदने या डावात काल खेळल्या गेलेल्या सिसिलियन बचावाचा अवलंब न करता आपल्या जुन्या हत्याराचा म्हणजे बर्लिन बचावाचा वापर केला. आनंदच्या ओपनिंगचा पर्याय बघून तमाम बुद्धिबळ रसिकांची निराशा झाली असणार. २000 सालच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्लादिमीर क्रॅमनिकने याचा यशस्वीपणे उपयोग करून त्या वेळच्या जगज्जेता कास्पारोव्हला पराभूत केले होते. परंतु त्यानंतर या पद्धतीबाबत एवढे अफाट संशोधन करण्यात आले, की त्यामुळे त्याची लोकप्रियता अजूनच वाढली.
आनंद आणि कार्लसन दोघांनीही कालच्या विश्रांतीच्या दिवसाचा सदुपयोग केल्याचे जाणवत होते. कारण त्यांच्या पहिल्या १५-१७ चाली इतक्या पटापट खेळल्या गेल्या, की जणू आपण जलदगती डावच बघायला बसलोय, असा भास झाला.
अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी नाशिकयेथे अनिश गिरी विरुद्ध राजदाबोव्ह या ग्रॅँडमास्टर्स मध्ये याच चालींनी खेळला गेलेला डाव या दोघांच्या अभ्यासात नक्की आला असणार. २३ व्या चालीनंतर मात्र कार्लसनने स्वत:चा वेगळा रस्ता तयार केला आणि इथून पुढे डावात रंगत निर्माण झाली. ८ व्या चालीलाच वजिरा-वजिरी होत असलेली पद्धत आनंदने का निवडली असावी, हे एक गूढच आहे. कारण या पद्धतीत काळ्या मोहऱ्याने खेळणाऱ्याला बरोबरीशिवाय जास्त काही मिळत नाही.