नकारात्मक विचारापेक्षा परिस्थिती स्वीकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 05:30 AM2020-04-11T05:30:52+5:302020-04-11T05:30:52+5:30

स्वरूप सावनूर; भारतीय खेळाडूंना क्रीडा मनसोपचारतज्ज्ञाचा सल्ला

Accept the situation rather than the negative | नकारात्मक विचारापेक्षा परिस्थिती स्वीकारा

नकारात्मक विचारापेक्षा परिस्थिती स्वीकारा

googlenewsNext

रोहित नाईक ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘सध्या लॉकडाउनमुळे सर्वच खेळाडू आपापल्या घरी असून मैदानापासूनच दूर आहेत. हीच गोष्ट त्यांना सर्वात जास्त सलत आहे. दररोज नेहमीचा सराव न केल्यास, नक्कीच खेळाडूंच्या कामगिरीवर थोडा परिणाम होईल, पण आत्ताची परिस्थिती खेळाडूंनी समजून घ्यावी. नकारात्मक विचार करण्यापेक्षा या परिस्थितीचा सर्वांनी स्वीकार करावा,’ असा मोलाचा संदेश क्रीडा मनसोपचारतज्ज्ञ डॉ. स्वरूप सावनूर यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून खेळाडूंना दिला आहे.
डॉ. सावनूर हे पुण्यातील लक्ष्य संस्थेच्या माध्यमातून देशातील अनेक आघाडीच्या खेळाडूंना मानसिक प्रशिक्षण देतात. बॉक्सर पूजा राणी, सिमरनजीत कौर, दिग्गज टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल, आघाडीचा कुस्तीगीर सुनील कुमार, युवा बुद्धिबळपटू विदित गुजराथी यांच्यासह अनेक रणजी क्रिकेटपटूंनाही सावनूर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. कोरोना विषाणूमुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे खेळाडू मैदानापासून दूर असले तरी घरातच व्यायाम करून शारीरिक तंदुरुस्ती राखण्याचा प्रयत्न करत आहेत. मैदानावर न गेल्यास कामगिरीवर परिणाम होईल, अशी भीतीही अनेक खेळाडूंमध्ये आहे.
याबाबत सावनूर म्हणाले की, ‘आज संपूर्ण देश कोरोनाविरुद्ध लढतोय. परिणाम नक्कीच दिसेल आणि ते स्वाभाविक आहे, पण खेळाडूंनी याचा स्वीकार करावा. परिस्थिती सुधारल्यानंतर आपल्याला योग्य योजना आखता येतील. यासाठी सर्व खेळाडूंनी मानसिकरीत्या सक्षम राहणे अत्यंत गरजेचे आहे. कामगिरीत थोडा परिणाम नक्कीच होईल, पण त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.’
सावनूर पुढे म्हणाले की, ‘लॉकडाउनचा काळ सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. खेळाडू मैदानापासून दूर आहेत. ते कायम स्पर्धेत व्यस्त असतात, त्यादृष्टीने त्यांचा सातत्याने सराव सुरू असतो. सध्या हे सर्व थांबले असल्याने त्यांंच्या मनात लय बिघडण्याची भीती आहे. यामुळे खेळाडू अतिरिक्त विचार करतात. नक्कीच आता दैनंदिन वेळापत्रक नसल्याने खेळाडूंच्या मनावर परिणाम होणारच, पण ते नकारात्मकतेने घेऊ नका. म्हणूनच हा वेळ खेळाडूंसाठी आव्हानात्मक आहे.’

आॅलिम्पिक पात्रतेचा दबाव!
‘आॅलिम्पिक पुढे ढकलण्यात आल्यानंतर खेळाडूंमध्ये पात्र ठरलेले आणि पात्रतेसाठी सज्ज असलेले असे दोन गट निर्माण झाले आहेत. आॅलिम्पिक पुढे गेल्याने नक्कीच मानसिकरीत्या खेळाडूंवर परिणाम झाला आहे. जे खेळाडू पात्र ठरण्याच्या उंबरठ्यावर होते, ते आॅलिम्पिक पात्रतेच्या विचाराने दबावात असणार. खेळाडूंनी वर्षभराचा विचार करण्यापेक्षा पुढील सहा महिन्यांचा विचार करण्याची गरज आहे,’ असेही डॉ. स्वरूप सावनूर यांनी सांगितले.

Web Title: Accept the situation rather than the negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.