३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा: जिम्नॅस्टिक्समध्ये 'सुवर्ण षटकार'! पदक तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 08:26 IST2025-02-12T08:25:52+5:302025-02-12T08:26:35+5:30
38th National Games : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले

३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा: जिम्नॅस्टिक्समध्ये 'सुवर्ण षटकार'! पदक तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
डेहराडून : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राने सहा सुवर्ण जिंकून ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा १५वा दिवस गाजविला. अक्रोबॅटिक प्रकारात चार सुवर्णपदकांसह एक रौप्य, अशी पाच पदकांची लयलूट केली. पाठोपाठ रिमिक्समध्ये सांधिक सुवर्ण व ट्रॅम्पोलिन वैयक्तिक प्रकारात एक सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली. या यशाने ३८ सुवर्णांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आला आहे. रिदमिक्समध्ये संयुक्ता काळे, किमया कार्ले, परिणा मदनपोत्रा व शुभश्री मोरे या महिला चौकडीने सोनेरी यश मिळवून दिले. छत्रपती संभाजीनगरच्या आयुष मुळे याने सर्वाधिक गुणांची कमाई करीत महाराष्ट्राला सुवर्ण जिंकून दिले.
अक्रोबॅटिकमध्ये ऋतुजा जगदाळे व निक्षिता खिल्लारे जोडीने सुवर्ण जिंकले. मिश्र दुहेरीत शुभम सरकटे व रिद्धी जैस्वाल जोडीने सुवर्ण तर पुरुष सांधिक गटात प्रशांत गोरे, नमन महावर, रितेश बोराडे, यझेश भोस्तेकर यांनी तिसरे सुवर्ण पदक जिंकून दिले. महिला सांधिकमध्ये अक्षता ढोकळे, अर्णा पाटील व सोनाली बोराटे या त्रिमूर्तीनी अक्रोबॅटिकमधील चौथे सुवर्ण जिंकले. गणेश पवार व आदित्य काळकुंद्रे यांनी रुपेरी यश मिळविले.
टेटेमध्ये रौप्यवर समाधान
टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू बंगालकडून ०-३ असे पराभूत झाल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जश मोदी याला अनिर्बन घोषकडून ७-११, १२-१०, ११-६, ४-११ ने पराभव पत्करावा लागला. रेगन अल्बुकर्क याला आकाश पाल याने ११-५,११-८, १२-१० असे सहज हरविले. चिन्मय सोमय्या याला सौरव शाह याने ११-७, ११-८, ८-११, ११-८ असे पराभूत करीत बंगालच्या विजेतेपदावर मोहोर उमटवली.