नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 05:41 IST2025-07-29T05:39:49+5:302025-07-29T05:41:09+5:30
महाराष्ट्रकन्या दिव्या तुझा अभिमान आहे...

नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
बाटुमी (जॉर्जिया) : टायब्रेकरचा सामना सुरू. समोर साक्षात ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी. खेळ संपत आलेला. शेवटच्या काही चाली बाकी. दिव्या देशमुखचा मेंदू दबावात. कोनेरूने पुढची चाल खेळली. आक्रमक दिव्याच्या तीक्ष्ण मेंदूने क्षणार्धात संधी ओळखली. एकच चाल अन् चेकमेट! कोनेरूला कळलं होतं... कोनेरूनं हात पुढं केला... येस्स... दिव्या, यू डीड इट! दिव्याच्या डोळ्यांतून झरझर वाहू लागले... अवघ्या १९ वर्षांच्या छोकरीने बुद्धिबळ विश्वचषक पटकावला. साेबतच ती ८८वी भारतीय ग्रँडमास्टरही झाली... महाराष्ट्राच्या लेकीनं इतिहास रचला... अवघा देश आनंदला! दिव्या, तुझा आम्हाला अभिमान आहे...
इतिहासात प्रथमच कोरले भारताचे नाव
महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचे नाव विश्वचषकावर कोरले गेले. या दोघींच्या आधी कोणत्याही भारतीय खेळाडूने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली नव्हती. नागपूरकर दिव्याने टायब्रेकरमध्ये पहिला डाव बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या डावात वेगवान खेळ करत हम्पीवर दडपण टाकले. दडपणात आलेल्या हम्पीकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत काळ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या दिव्याने कमाल केली.
चार भारतीय महिला होत्या उपांत्यपूर्व फेरीत
कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली, वैशाली रमेशबाबू आणि दिव्या देशमुख या चार भारतीय महिला खेळाडूंनी या स्पर्धेत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय बुद्धिबळासाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.
डोम्मराजू गुकेश गेल्या वर्षी विश्वविजेता
१९ वर्षीय भारतीय डोम्मराजू गुकेश गेल्या वर्षी पुरुष बुद्धिबळात विश्वविजेता बनला. १२ डिसेंबर २०२४ रोजी त्याने वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी चीनच्या डिंग लिरेनला हरवून विजेतेपद पटकावले.
दिव्याने रचला इतिहास, ‘दिव्या’ खास का?
१७ व्या वर्षी दोन वेळा राष्ट्रीय महिला विजेतेपद, १८ व्या वर्षी पहिले वुमेन्स कॉन्टिनेंटल विजेतेपद, बनली आशियाची बुद्धिबळ राणी, गेल्या वर्षी जूनमध्ये अंडर-२० वर्ल्ड ज्यूनियर चॅम्पियन पदवी (तिसरे जागतिक विजेतेपद), दिव्या भारतातील ज्युनियर नंबर १ पासून वर्ल्ड ज्युनियर नंबर १ अशा रँकवर पोहोचली असून सध्या ती या रँकवर कायम आहे.
पुढे काय? आता कोण शिकार?
कॅन्डिडेट्स स्पर्धा जिंकून जु वेनजुन (चीन) या सध्याच्या वर्ल्ड वुमेन्स चॅम्पियनला आव्हान देणार
आईचा त्याग : दिव्याच्या या यशामध्ये आई डॉ. नम्रता यांचे मोठे योगदान आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळणाऱ्या दिव्यासाठी त्यांनी काम सोडले आणि आपला पूर्ण वेळ दिव्यासाठी दिला. विश्वचषक विजेतेपद पटकावल्यानंतर दिव्याने आपल्या आईला मिठी मारली. भावनिक झालेल्या दिव्याला आईने आधार दिला. स्वत:ला सावरून दिव्याने मुलाखत दिली.
युवा दिव्या देशमुख हिचा अभिमान आहे. उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन! तिच्या या यशामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल. हम्पीनेही शानदार कौशल्य दाखवले. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
दिव्याने अजिंक्यपद स्पर्धेत बाजी मारली ही नागपूर आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही तिचा सन्मान करू. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.
भारताची जागतिक बुद्धिबळातील ताकद
विद्यमान विश्वविजेता : डी. गुकेश
ऑलिम्पियाड विजेता (खुला गट) : भारत
ऑलिम्पियाड विजेता (महिला गट) : भारत
महिला विश्वचषक : दिव्या देशमुख
महिला जागतिक रॅपिड विजेती : कोनेरू हम्पी
यशाचा ‘दिव्या’लेख
२०१० : वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात
२०१२ : पुडुचेरी येथे अंडर ७ गटात पहिले राष्ट्रीय सुवर्णपदक
२०१३ : इराणमध्ये आशियाई स्पर्धेत अंडर ८ गटात विजेतेपद
२०१३ : सर्वात कमी वयाची वुमन फिडे मास्टर बनली
२०१४ : दक्षिण आफ्रिकेत डर्बन येथे अंडर १० गटात वर्ल्ड चॅम्पियन. (आतापर्यंत या स्पर्धेत दिव्याने भारताचे ४० वेळा प्रतिनिधित्व केले असून, २३ सुवर्ण, ७ रौप्य, ५ कांस्य अशी ३५ पदके जिंकली.)
२०२० : फिडेद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेतलेल्या ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या विजयी संघात सहभागी
२०२३ : इंटरनॅशनल मास्टर पदवी प्राप्त
२०२५ : १९ व्या वर्षी भारताची ८८वी ग्रँडमास्टर; कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्ली, वैशाली रमेशबाबू यांच्यानंतर भारताची चौथी महिला ग्रँडमास्टर.