लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कॅन्सरवर उपचार सुरू असल्याने लागणारा खर्च व गावी घर बांधण्यासाठी ठेवलेली जमा रक्कम अशा ३५ लाखांवर चोरट्याने डल्ला मारल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. बेस्टमधून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यासोबत हा प्रकार घडला. पत्नी कामावर असता, ते वाशीला गेले असता यादरम्यान ही घटना घडली. नेरूळ सेक्टर -३ येथे गुरुवारी ३५ लाख ४२ हजारांची घरफोडीची घटना घडली. यामध्ये २५ लाखांची रोकड व १० लाखांच्या दागिन्यांचा समावेश आहे. बेस्टमधून निवृत्त झालेले अधिकारी पत्नीसह नेरुळ येथे राहतात. गुरुवारी पत्नी कामावर गेल्या होत्या तर ते वाशीला आले होते. यादरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली. रात्री साडेसातच्या सुमारास दोघेही एकत्र घरी आले असता, त्यांना दरवाजा उघडा दिसला. यामुळे त्यांनी घरातील ऐवज, रोकड तपासली असता, ती मिळून आली नाही. कपाट तोडून त्यातील साहित्य विस्कटल्याचे दिसले. यावरून अज्ञाताने त्यांच्या घरात चोरी केल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये त्यांची २५ लाखांची रोकड व १० लाखांचे दागिने चोरीला गेले आहेत.
आर्थिक संकटात
निवृत्त अधिकाऱ्याला कॅन्सरचे निदान झाले असून उपचार सुरू आहेत. यासाठी लागणारा उपचार खर्च व गावी घर बांधण्यासाठी जमा केलेली रोकड त्यांनी एकत्र घरात ठेवली होती, त्यावरच चोरट्याने हात मारल्याने हे अधिकारी आर्थिक संकटात सापडले आहेत. घरफोडीप्रकरणी नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.