"तो रस्ता नेव्हिगेशनसाठी मॅप केला नव्हता"; कारसह महिला बेलापूर खाडीत पडल्यानंतर गुगलचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 16:34 IST2025-07-31T16:33:41+5:302025-07-31T16:34:12+5:30
गुगल मॅपमुळे कारसह महिला खाडीत पडल्यानंतर कंपनीने स्पष्टीकरण दिले

"तो रस्ता नेव्हिगेशनसाठी मॅप केला नव्हता"; कारसह महिला बेलापूर खाडीत पडल्यानंतर गुगलचे स्पष्टीकरण
Belapur creek Accident: आठवड्याभरापूर्वी बेलापूर येथे गुगल मॅपवर दाखवलेल्या रस्त्यावरुन जाताना कारसोबत एक महिला खाडीमध्ये पडली होती. सुदैवाने तिथे उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि तात्काळ मदत करत महिलेचा जीव वाचवला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कार बाहेर काढण्यात आाली. २५ जुलैच्या पहाटे १ वाजण्याच्या सुमारास ही महिला कारने उलवेच्या दिशेने जात होती. गुगल मॅपवर रस्ता दाखवल्याने तिने पुलावरून न जाता ती खालच्या रस्त्याने गेली आणि थेट खाडीत कोसळली. आता या घटनेवर गुगलने स्पष्टीकरण दिलं आहे.
बेलापूर येथे महिलेसोबत घडलेल्या घटनेनंतर गुगलने आता एक निवेदन जारी केले आहे. महिलेने या अपघातासाठी गुगल मॅप्सला जबाबदार धरले आणि हा रस्ता नेव्हिगेशन सिस्टमने सुचवला होता असा दावा केला होता. त्यावर गुगलने स्पष्ट केलं की त्यावर दाखवलेला मार्ग हा नेव्हिगेशनसाठी मॅप केलेला नव्हता. "आम्ही स्पष्ट करतो की पुलाखालचा रस्ता गुगल मॅप्समध्ये नेव्हिगेशनसाठी मॅप केलेला नाही आणि आमच्या तपासातून स्पष्ट होते की मॅप्सने त्यावरून जाण्याचा मार्ग सुचवला नव्हता," असं गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले.
"या भागात गुगल मॅप्सद्वारे दाखवलेला एकमेव मार्ग म्हणजे पनवेल खाडीवरील बेलापूर पूल. आम्ही सुरक्षितता आणि विश्वासार्हता लक्षात घेऊन गुगल मॅप्स तयार केले आहेत आणि आम्ही सर्वत्र लोकांना उच्च दर्जाचा नेव्हिगेशन अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करत राहू," असं गुगलच्या प्रवक्त्याने टेलिग्रामला सांगितले.
खारघर येथील श्वेता शर्मा या उलवे येथे जात होत्या. मुसळधार पाऊस पडत असताना गुगल मॅप्सच्या मदतीने प्रवास करत होत्या. ध्रुवतारा जेट्टीवरील उड्डाणपुलावरून जात असताना त्या गोंधळल्या. त्यांनी वरचा रस्ता निवडण्याच्या ऐवजी त्या ध्रुवतारा जेट्टीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या रस्ताने गेल्या. गुगल मॅपवर दिसत असल्याप्रमाणे तिथे सरळ रस्ता असल्याचे त्यांना वाटले. यामुळे त्यांची कार थेट ध्रुवतारा जेट्टीवर जाऊन खाडीत कोसळली. जेट्टीला सुरक्षा कठडा नसल्याने कार कुठेही न थांबता थेट खाडीत पडली.
दरम्यान, तिथल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी हा प्रकार पाहिला आणि घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी श्वेता शर्मा या वाहत जात असल्याचे दिसून आले. त्यांना गस्ती व रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात. त्यानंतर खाडीत पडलेली कार क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली.