प्रेयसीच्या मदतीने पत्नीचा काढला काटा, प्रेमसंबंधातून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 14:20 IST2022-09-21T14:19:46+5:302022-09-21T14:20:14+5:30
देवव्रतसिंग याचे निकिता मतकर (२४) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी मंदिरामध्ये लग्नदेखील केले असल्याचे समोर आले आहे.

प्रेयसीच्या मदतीने पत्नीचा काढला काटा, प्रेमसंबंधातून हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : नवीन पनवेल रेल्वेस्थानकाबाहेर १५ सप्टेंबर रोजी विहीघर येथे राहणाऱ्या प्रियंका रावत या २९ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा खांदेश्वर पोलिसांनी छडा लावला असून, प्रियंकाचा पती देवव्रतसिंग रावत, त्याची प्रेयसी निकिता, हत्येची सुपारी देणारा निकिताचा साथीदार प्रवीण घाडगे तसेच तीन सुपारी किलर अशा एकूण सहा जणांना अटक केली आहे.
देवव्रतसिंग याचे निकिता मतकर (२४) हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांनी मंदिरामध्ये लग्नदेखील केले असल्याचे समोर आले आहे. या दोघांमधील प्रेमसंबंधाची माहिती प्रियंका हिला समजली. मात्र, या दोघांच्या प्रेमात प्रियंका अडसर ठरत होती. त्यामुळे निकिता आणि देवव्रतसिंग या दोघांनी प्रियंकाची सुपारी देऊन तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. निकिता हिने प्रवीण याला प्रियंकाची हत्या करण्यासाठी सुपारी किलरला शोधण्यास सांगितले होते. त्यानुसार घाडगे याने बुलडाणा येथील ३ सुपारी किलरला ३ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यानुसार तिघा सुपारी किलरने १५ सप्टेंबर रोजी प्रियंका कामाला असलेल्या ठाण्यातील तिच्या कार्यालयापासून तिच्यावर पाळत ठेवली. तसेच तिचा ठाण्यापासून पनवेलपर्यंत लोकलमधून पाठलाग केला. प्रियंका पनवेल रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर तिघा सुपारी किलरपैकी पंकज नरेंद्रकुमार यादव (२६) याने नवीन पनवेल रेल्वेस्थानकाबाहेर रात्रीच्या वेळेस प्रियंकाच्या गळ्यावर चाकूने वार करून हत्या करून पलायन केले.