खारघरच्या तरुणाईला अमली पदार्थांपासून वाचविणार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 06:17 IST2024-11-26T06:16:55+5:302024-11-26T06:17:18+5:30
अनधिकृत पानटपऱ्यांमधून विक्री होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी

खारघरच्या तरुणाईला अमली पदार्थांपासून वाचविणार कोण?
वैभव गायकर
पनवेल : शैक्षणिक हब म्हणून उदयास येत असलेल्या खारघर शहरातील तरुणाईला अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढण्याचे काम सध्या खारघर शहरात सुरू आहे. शहरातील अनधिकृत पानटपऱ्यांसह रात्रीच्या अंधारात अमली पदार्थ, बंदी असलेला गुटखा तसेच विदेशी बनावटीची विविध उत्पादने विक्री केली जात असल्याच्या तक्रारी असून, स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
खारघर शहर आणि तळोजामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केल्याच्या घटना अनेक वेळा उघड झाल्या आहेत. चरस गांजा मोक्याच्या ठिकाणी उभारलेल्या पानटपऱ्याच्या माध्यमातून तरुणाईपर्यंत पोहोचवले जात आहेत. खारघर शहरात २५ पेक्षा जास्त शाळा, महाविद्यालये आहेत. हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात.
पोलिस बघ्याच्या भूमिकेत
शाळा महाविद्यालयापासून ठराविक अंतरावर अशा प्रकारे गुटखा तसेच धूम्रपान करणे निषिद्ध असताना थेट शाळा महाविद्यालय परिसरात पानटपऱ्या थाटल्याचे पाहावयास मिळते. विशेष म्हणजे दिवसरात्र पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांसमोर हा प्रकार सुरू असताना खारघर पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत. खारघर शहरात एकूण ४० सेक्टर आहेत. या प्रत्येक सेक्टरमध्ये २ ते ३ पानटपऱ्यांची अनधिकृत दुकाने थाटून सर्रास बंदी असलेले उत्तेजित पदार्थ विक्री केले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
गार्डन गर्दुल्ल्यांचे अड्डे
प्रत्येक सेक्टरमध्ये सिडकोने गार्डन उभारल्या आहेत. शहरातील नागरिक या ठिकाणी विरंगुळा तसेच व्यायाम करण्यासाठी येत असतात.
रात्री अनेक गर्दुल्ले अथवा काही तरुण मंडळी नशेच्या पदार्थांचे सेवन करताना दिसतात. अनेक वेळा या घटनांच्या तक्रारी पोलिस ठाण्यात देखील गेलेल्या आहेत.