इमिग्रेशनसाठी पोलिसांचे बळ कधी मिळणार? नवी मुंबई विमानतळाचे आज उद्घाटन पण...
By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 8, 2025 09:30 IST2025-10-08T09:30:21+5:302025-10-08T09:30:45+5:30
मुंबईला पर्यायी नवी मुंबईत उभारलेल्या नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे बुधवारी उद्घाटन होत आहे.

इमिग्रेशनसाठी पोलिसांचे बळ कधी मिळणार? नवी मुंबई विमानतळाचे आज उद्घाटन पण...
- सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : उद्घाटनाच्या टप्प्यावर असलेल्या नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशनसाठी अद्याप पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. डिसेंबरमध्ये पहिले प्रवासी विमान उडण्याची शक्यता असून त्यासाठी २८५ पोलिसांची पदनिर्मिती केली आहे. त्यानुसार गत महिन्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये विमानतळावर इमिग्रेशनसाठी पोलिस दिले होते. मात्र, त्या बदली आदेशांना स्थगिती मिळाल्याने अद्याप नव्याने पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
मुंबईला पर्यायी नवी मुंबईत उभारलेल्या नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे बुधवारी उद्घाटन होत आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये प्रत्यक्षात विमानतळावरून प्रवासी उड्डाणे नियोजित आहेत. त्यासाठी आवश्यक इमिग्रेशन प्रक्रिया हाताळणीकरिता नवी मुंबई पोलिसांची ताकद लावली जाणार आहे.
का उशीर झाला नियुक्तीला?
नवी मुंबई पोलिस दलातून हे संख्याबळ विमानतळासाठी देणे शक्य नसल्याने नवी मुंबई पोलिसांनी शासनाकडे पदनिर्मितीची मागणी करून आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची मागणी केली होती.
त्यानुसार गत महिन्यात निघालेल्या बदली आदेशात विमानतळासाठी अधिकारी व कर्मचारी पुरवले होते. डिसेंबरपूर्वी त्यांचे इमिग्रेशनच्या कामकाजाचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना सज्ज करणे अपेक्षित होते.
मात्र, त्या बदली आदेशांना स्थगिती मिळाल्याने अद्यापपर्यंत नवे बदली आदेश निघालेले नाहीत. यामुळे नवी मुंबई पोलिसांकडे विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रिया हाताळणीसाठी अद्याप पुरेसे मनुष्यबळ पुरवण्यात आलेले नाही.
त्यामुळे पोलिस महासंचालक कार्यालयातून वेळेत नवे बदली आदेश न निघाल्यास त्याचा परिणाम विमानांच्या निश्चित उड्डाण कालावधीवरदेखील होऊ शकतो.
पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल दर्जाचे कर्मचारी सामील.