फक्त उद्घाटनापुरती सुरू केली वॉटर टॅक्सी, २ दिवसांत बंद; सर्वसामान्यांचे स्वप्न अधुरेच 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 09:45 AM2022-02-19T09:45:33+5:302022-02-19T09:46:06+5:30

प्रतिसाद वाढल्यानंतरच सेवेत; २९० रुपयांत जलसफरीचे स्वप्न अधुरे

Water taxi started only for inauguration, closed in 2 days; The dream of the common man is unfulfilled | फक्त उद्घाटनापुरती सुरू केली वॉटर टॅक्सी, २ दिवसांत बंद; सर्वसामान्यांचे स्वप्न अधुरेच 

फक्त उद्घाटनापुरती सुरू केली वॉटर टॅक्सी, २ दिवसांत बंद; सर्वसामान्यांचे स्वप्न अधुरेच 

Next

सुहास शेलार

मुंबई :  बहुचर्चित वॉटर टॅक्सी प्रकल्पाचे थाटामाटात उद्घाटन झाले असले, तरी २९० रुपयांत जलसफरीचे सर्वसामान्यांचे स्वप्न अधुरेच राहणार आहे. या मार्गावरील ५६ आसनी बोट पुढील दोन दिवसांनंतर बंद केली जाणार असून, केवळ उद्घाटनापुरतीच ती बेलापूर ते मुंबई जलमार्गावर उतरविण्यात आली होती.

मुंबई ते बेलापूर, जेएनपीटी आणि एलिफंटा मार्गावर देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा गुरुवारपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी कॅटामरान श्रेणीतील ५६ आसनी फेरीबोटीसह १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या आठ बोटी तैनात करण्याची घोषणा करण्यात आली. ५६ आसनी बोटीसाठी २९० रुपये आणि लहान बोटींसाठी ८०० ते १,२१० रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले. अन्य बोटींच्या तुलनेत कॅटामरानचे तिकीट परवडणारे असल्याने नव्या मार्गावर किमान एकदातरी जलसफर अनुभवण्याचे नियोजन अनेकांनी केले. मात्र, नेमकी हीच बोट बंद केली जाणार असल्याने त्यांना हौसेला मुरड घालावी लागणार आहे.

मुंबई ते बेलापूर मार्गावर सेवा देणाऱ्या जलवाहतूकदार संस्थेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपोलो-२ ही कॅटामरान श्रेणीतील फेरीबोट केवळ दोन दिवसांकरिता प्रायोगिक तत्त्वावर सेवेत उतरविण्यात आली आहे. प्रवासी वाढल्यानंतरच ती सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, किमान उद्घाटनापुरती तरी बोट सुरू करण्याची सूचना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून करण्यात आली. त्यानुसार दोन दिवस पूर्ण झाले की कॅटामरान बोट सेवेबाहेर केली जाईल. 

या बोटीला वाहतुकीचा पूर्णवेळ परवाना मिळालेला असला तरी सद्यस्थितीत इतकी मोठी बोट या मार्गावर चालवणे परवडणारे नाही. कारण एका फेरीमागे १२ हजार रुपयांचे डिझेल खर्च होते. त्यातुलनेत प्रवासी संख्या ५ ते ७ इतकीच नोंदविण्यात येत असल्यामुळे फेरीमागे दीड-दोन हजार रुपयेच मिळत आहेत. तिकिटाच्या २९० रुपयांमधील ३० रुपये शासनाला कर स्वरुपात द्यावे लागतात. त्यामुळे फेरीबोट चालकांच्या हातात केवळ २६० रुपये उरतात, अशीही माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

अडचणी काय?

  • बेलापूरहून लोकल ट्रेनने २० रुपयांत ‘सीएसएमटी’ला पोहोचता येते. त्यासाठी कोणताही प्रवासी ८०० रुपये का मोजेल? 
  • वॉटर टॅक्सीच्या फेऱ्याही मर्यादित स्वरुपात आहेत. त्यामुळे नियमित प्रवास करणारे तास-दीडतास वाट का पाहतील? 
  • दुसरे म्हणजे जेट्टीपर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचा वेगळा खर्च आहे. तो जवळपास १०० रुपयांच्या घरात आहे. इतका अतिरिक्त खर्च करून प्रवासी वॉटर टॅक्सीने प्रवास करण्याची शक्यता फारच कमी आहे.
  • बोटचालकांना अनुदान देऊन तिकीट दर कमी केले, तरच ही सेवा यशस्वी होईल, असे मत जलवाहतूक तज्ज्ञ शराफत मुकादम यांनी व्यक्त केले.

Web Title: Water taxi started only for inauguration, closed in 2 days; The dream of the common man is unfulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.