नवी मुंबईकरांवर पाणीसंकट; मोरबेत चार महिने पुरेल इतकेच पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 23:23 IST2019-04-09T23:22:50+5:302019-04-09T23:23:36+5:30
स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका आहे.

नवी मुंबईकरांवर पाणीसंकट; मोरबेत चार महिने पुरेल इतकेच पाणी
नवी मुंबई : शहराला २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. सध्या धरणात चार महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबई व अन्य बड्या शहरापाठोपाठ यावर्षी नवी मुंबईकरांवरही पाणीकपातीचे संकट घोंगावू लागले आहे, त्यामुळे पाण्याच्या स्वैरवापराला आळा घालण्याचे मोठे आवाहन महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका आहे. खालापूर तालुक्यातील स्व:मालकीच्या मोरबे धरणातून महापालिका शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा करते. गेल्या वर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस पडला. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाल्याने ७०० दशलक्ष पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. असे असतानाही यावर्षी धरणातील पाण्याची पातळी खालावल्याचे दिसून आले आहे. मोरबे धरणाची पातळी ८८ मीटर इतकी आहे, म्हणजेच ८८ मीटर पातळी गाठल्यानंतर धरणात १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो. सध्या धरणात ९४.३७ दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा साधारण १५ आॅगस्टपर्यंत पुरेल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मान्सूनला आणखी दीड ते दोन महिने उरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दहा टक्के पाऊस कमी पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुबलक पाणी वापरण्याची सवय लागलेल्या नवी मुंबईकरांना यावर्षी काही प्रमाणात काटकसर करावी लागणार आहे.
महापालिका मोरबे धरणासह उपलब्ध विविध स्रोतांच्या माध्यमातून दिवसाला एकूण ३२७ एमएलडी इतका पाणीपुरवठा करते.
सिडको नोड्सनाही पाणीपुरवठा
मोरबे धरणासह एमआयडीसी आणि सिडकोकडून महापालिकेच्या जलकुंभात दिवसाला ३२७ एमएलडी इतका पाणीसाठा होतो. यापैकी खारघर, कळंबोली व कामोठे या सिडको नोड्सना महापालिका पाणीपुरवठा करते. तर जलकुंभातील एकूण जलसाठ्यापैकी जवळपास २७० एमएलडी इतके पाणी नवी मुंबईतील विविध उपनगरांना पुरविले जाते.