दुचाकी चोरणारे त्रिकूट अटकेत
By Admin | Updated: October 9, 2016 03:32 IST2016-10-09T03:32:12+5:302016-10-09T03:32:12+5:30
दुचाकी चोरीप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यापैकी दोघे जण सराईत गुन्हेगार असून, तिघांकडून चोरीच्या १५ मोटारसायकली जप्त करण्यात

दुचाकी चोरणारे त्रिकूट अटकेत
नवी मुंबई : दुचाकी चोरीप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यापैकी दोघे जण सराईत गुन्हेगार असून, तिघांकडून चोरीच्या १५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरून वापर केल्यानंतर अज्ञात ठिकाणी सोडून दिल्याचे तपासात उघड झाले आहे.
वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांकडून गुन्हेगारांची झाडाझडती घेण्याचे काम सुरू आहे. याकरिता कोपरखैरणे पोलिसांमार्फत विभागातील सराईत गुन्हेगारांची शोधमोहीम सुरू होती. त्याकरिता वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांच्याकडून गुन्हेगारांची चाचपणी सुरू असताना दोघा दुचाकी चोरांची माहिती मिळाली. त्याआधारे कोपरखैरणे गावातून दोघांना ताब्यात घेण्यात आले. कुणाल यादव (१९) व अजय निर्मल (२०) अशी त्यांची नावे आहेत. चौकशीत त्यांनी परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यादव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर वाशी पोलीस ठाण्यातदेखील गुन्हे दाखल आहेत. दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातील असून, दोघांच्याही वडिलांचे निधन झालेले आहे, तर दोघांनीही शिक्षणही अर्धवट सोडलेले आहे. मागील दीड महिन्यात त्यांनी परिसरातून अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याचे पोलीस उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. त्यापैकी १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
केवळ मित्रांसोबत मौजमजा करण्याच्या उद्देशाने त्यांनी या दुचाकी चोरल्या होत्या. बनावट चावीच्या आधारे चोरलेल्या या दुचाकी वापर केल्यानंतर अथवा पेट्रोल संपल्यानंतर त्यांनी अज्ञात ठिकाणी सोडून दिल्या होत्या. चोरीच्या दुचाकीवरून फिरत असताना, ज्या मार्गावर नाकाबंदी सुरू असेल अशा मार्गाने जाणे ते टाळायचे. यामुळे अद्यापपर्यंत ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यांना ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान, कळवा पोलिसांच्या अटकेतील संदेश मालाडकर याला कोपरखैरणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानेही कोपरखैरणेतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र या वाहनांच्या चोरीच्या गुन्ह्याची नोंदच नसल्यामुळे पोलीस दुचाकी मालकांचा शोध घेत आहेत. तर मालाडकर या सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या तिघांकडून चोरीच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)