दहा वृक्षांसह दोन वीज खांब कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 02:32 IST2019-06-12T02:31:59+5:302019-06-12T02:32:13+5:30
नवी मुंबईत पावसाची दमदार हजेरी : वीजपुरवठा खंडित; मोरबे धरण परिसरातही पडला पाऊस

दहा वृक्षांसह दोन वीज खांब कोसळले
नवी मुंबई : पनवेलसह नवी मुंबई परिसरामध्ये दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये दहा वृक्ष कोसळले असून पथदिव्यांचे दोन खांबही पडल्याची घटना घडली. मोरबे धरण परिसरामध्येही पाऊस पडला असल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबईमध्ये रविवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू लागल्यामुळे काही वेळ वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. नेरूळ सेक्टर १६ मधील मंगलमूर्ती सोसायटीसमोरील पथदिव्यांचा खांब पडला. सुदैवाने त्यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भगत यांनी, विद्युत विभागाचे संजय पाटील यांना माहिती देऊन तत्काळ खांब हटविण्याचे काम सुरू केले. अक्षय काळे, सूर्या पात्रा, विकास तिकोने, राहुल गायकवाड, रुनाल सुर्वे व इतर तरुणांनीही सहकार्य केल्यामुळे वेळेत पोल बाजूला करून वाहतूक सुरळीत करता आली. सोमवारी रात्री ऐरोलीमध्ये ३ व नेरूळमध्ये एक वृक्ष कोसळल्याची घटना घडली.
नेरूळ, सानपाडा, एपीएमसी परिसरामध्ये काही ठिकाणी रोडवर पाणी साचल्याची घटना घडली होती. एका दिवसामध्ये १८.९० मिमी पावसाची नोंद झाली होती. मंगळवारी दुपारीच पावसाने हजेरी लावली. दिवसभर विविध विभागामध्ये पाऊस पडू लागला होता. नेरूळमध्ये सहा ठिकाणी वृक्ष कोसळले. दोन दिवसामध्ये एकूण दहा वृक्ष कोसळल्याची घटना घडली.
महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण परिसरामध्येही पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी ४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण परिसरामध्येही पावसाचे आगमन झाल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. पावसाने रेल्वे वाहतुकीवरही काही प्रमाणात परिणाम झाला होता. अनेक लोकल उशिरा धावत होत्या. पावसाचे पाणी नाल्यांमध्ये जाण्यासाठी असलेल्या मार्गात कचरा साठला असल्यामुळे काही ठिकाणी पाणी निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊ लागला होता.
सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी स्वेच्छेने अनेक ठिकाणी पाणी जाण्याच्या मार्गातील अडथळे दूर केले.
काचांना तडे
विजा आणि वाºयाच्या सोसाट्यात सुरू झालेल्या पावसाचा फटका नवी मुुंबई महापालिका मुख्यालयाच्या इमारतीच्या काचांना बसला आहे. सोमवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसात विजेच्या कडकडाटाने महापालिका मुख्यालय इमारतीच्या तिसºया मजल्यावरील काचेला तडे गेले आहेत. काचेवरील प्लॅस्टिक आवरण असल्यामुळे काचांचे तुकडे खालील मजल्यावर पडले नाहीत त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे महापालिका मुख्यालयात काम करणाºया तसेच कामानिमित्त ये-जा करणाºया नागरिकांच्या
सुरक्षेचा प्रश्न निर्माण
झाला आहे.
एपीएमसीतील आवक सुरळीत
पाऊस पडला की मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमधील आवकवर परिणाम होत असतो. परंतु मंगळवारी मार्केट सुरळीत सुरू होते. दिवसभरात ५१८ ट्रक व टेम्पोमधून भाजीपाल्याची आवक झाली होती. इतर मार्केटमधील व्यवहारावरही पावसाचा फारसा परिणाम झाला नव्हता.
पनवेलमध्ये पहिल्याच पावसात बत्ती गुल; महावितरण नॉटरिचेबल
पनवेलमध्ये सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या रहिवाशांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला. मात्र रात्री उशिरा लावलेल्या पावसाच्या हजेरीमुळे शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे महावितरण कार्यालयाचे फोन यावेळी बंद होते.
पनवेल तालुक्यात २७ मिमी पावसाची नोंद करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आली. पहिल्या पावसाचे आगमन जोरात झाले मात्र कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. विजेच्या कडकडाटासह हा पाऊस सुरू होता. मध्यरात्रीपर्यंत पावसाचा जोर कमी झाला. मात्र शहरातील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. पनवेल शहरात महावितरणच्या विद्युत वाहिन्या अतिशय जीर्ण झालेल्या आहेत. अतिशय जुन्या विद्युतवाहिन्या असल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचे कारण शोधण्यास महावितरणला मोठा कालावधी लागतो. पनवेल शहरासह नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.