रबाळे एमआयडीसीत दोन कंपन्यांना आग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 09:08 AM2021-03-17T09:08:21+5:302021-03-17T09:09:01+5:30

मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास बाळे एमआयडीसीमधील ए.एस.व्ही. मल्टीकेमिकल्स या कंपनीत आग लागली. आगीमध्ये कंपनीतील केमिकलने पेट घेतल्याने छोटे स्फोट होऊ लागले.

Two companies fire at Rabale MIDC | रबाळे एमआयडीसीत दोन कंपन्यांना आग

रबाळे एमआयडीसीत दोन कंपन्यांना आग

googlenewsNext

नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीमधील ए.एस.व्ही. केमिकल्स या कंपनीला आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. आग अधिक पसरल्याने शेजारच्या एका कंपनीने पेट घेतला होता. त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सुमारे तीन तास प्रयत्न करावे लागले. 

मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास बाळे एमआयडीसीमधील ए.एस.व्ही. मल्टीकेमिकल्स या कंपनीत आग लागली. आगीमध्ये कंपनीतील केमिकलने पेट घेतल्याने छोटे स्फोट होऊ लागले. त्यामुळे काही मिनिटांतच संपूर्ण कंपनीत आग पसरली. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निघत होते, तर सतत होणाऱ्या छोट्या छोट्या स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आगीची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी  धाव घेतली. 

त्यांच्याकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू असतानाच छोटे मोठे स्फोट होत होते. आगीचा भडका होऊन शेजारच्या शेखर ऑप्टो इलेक्ट्राॅनिक्स या कंपनीने पेट घेतला होता. त्यामुळे महापालिका अग्निशमन दलाचे व इतर एकूण सहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते. ही आग वेळीच आटोक्यात न आल्यास परिसरातील इतरही कंपन्यांना धोका होता. त्यामुळे सलग तीन तास प्रयत्न करून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे एमआयडीसी अग्निशमन दलाचे अधिकारी आर. बी. पाटील यांनी सांगितले; परंतु आगीमध्ये दोन्ही कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. खबरदारी म्हणून परिसरातल्या इतरही कंपन्यांमधील कामगारांना बाहेर काढण्यात आले होते. 
 

Web Title: Two companies fire at Rabale MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.