कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: ठाणे-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणाऱ्या २५.२ किलोमीटर लांबल्या उन्नत मार्गाचा प्रकल्प दृष्टिपथावर आला आहे. सिडकोने नुकताच या प्रस्तावित मार्गाचा डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सादर केला होता. मुख्यमंत्र्यांनी त्याला मंजुरी दिली असून, पुढील नियोजन करून तीन वर्षाच्या आत हा मार्ग पूर्ण करण्याचे ठरले आहे. यामुळे दोन्ही ठिकाणांचा प्रवास सुसाट होणार आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे ६,३६२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तो ठाणे येथील धन निरंकारी चौकाजवळील पटनी मैदानापासून वाशी येथील पाम बीच रोडपर्यंत ६ लेनांचा, म्हणजे तीन अधिक तीन लेनांचा असेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डिसेंबरमध्ये प्रवासी विमानसेवा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर, ठाणे, कल्याण, भिवंडी, डोंबिवलीसह आसपासच्या परिसरांतील रस्त्यांवर ताण अपेक्षित आहे. त्यामुळे विमानतळाला जलद आणि सुरळीत कनेक्टिव्हिटीसाठी हा उन्नत मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
सहा ठिकाणी इंटरचेंज
या मार्गावर सहा ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत, ज्यामध्ये कोपरी-पटणी पूल, ऐरोली-घणसोली, घाटकोपर-कोपरखैरणे, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच रोड आणि उलवे कोस्टल रोड यांचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली.
एलिव्हेटेड मार्गाचा प्रकल्प आराखडा तयार आहे. शासनाने त्याला हिरवा कंदील दाखविला असून, सल्लागारासह कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू होईल.- विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक, सिडको
प्रकल्प आराखडा तयार
प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी अर्बन मास ट्रान्झिट कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने प्रकल्प अहवाल तयार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तो सादरीकरण केले.