A trauma-injured student needs help | अपघातातील दुखापतग्रस्त विद्यार्थिनीला मदतीची गरज

अपघातातील दुखापतग्रस्त विद्यार्थिनीला मदतीची गरज

पनवेल : पळस्पे येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयातील तीन विद्यार्थिनींना मद्यपी वाहनचालकाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात काजल गायकवाडचा हिचा मृत्यू झाला तर मीनल चौधरी व स्वप्नाली ठोंबरे या दोघी जखमी झाल्या आहेत. यापैकी स्वप्नाली ठोंबरे ही पनवेलमधील खासगी रुग्णालयात दाखल आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने ठोंबरे कुटुंबीयांवर उपचाराचे मोठे संकट ओढवले आहे.

मंगळवारी स्वप्नालीचे आॅपरेशन करण्यात आले. अपघातात स्वप्नाली ठोंबरेच्या जबड्यावर मार लागला आहे. यामुळे स्वप्नाली ठोंबरेला
आपले दात गमवावे लागले आहेत. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे ठोंबरे कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले असून वैद्यकीय खर्च परवडणारा नसल्याने ते हतबल झाले आहेत.


छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे चेअरमन रवींद्र चोरघे यांनी विद्यालयाच्या वतीने सुमारे १५ हजारांची आर्थिक मदत ठोंबरे यांना केली आहे. शाळेतील शिक्षक-विद्यार्थीदेखील आर्थिक मदतीसाठी पैसे जमवत आहेत. मात्र, खर्च वाढणार असल्याने चिंतेत असल्याचे स्वप्नालीची आई सुनंदा मनोहर ठोंबरे यांनी सांगितले.

चार मुलींपैकी दोन मुलींची लग्न झाली आहेत. दोन मुलीचे शिक्षण सुरू असताना अशाप्रकारे संकटाला तोंड देण्याची वेळ आमच्यावर आल्याचे सुनंदा यांनी सांगितले. दरम्यान, मृत काजल गायकवाड ही स्वप्नालीच्या आत्याची मुलगी आहे. काजलला मृत्यू झाल्याची माहिती अद्याप स्वप्नालीला देण्यात आलेली नाही.स्वप्नाली दररोज काजलच्या तब्बेतीची विचारपूस करत असल्याचे सुनंदा यांनी सांगितले. अपघातात जखमी झालेली तिसरी मुलगी मीनल चौधरीला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आहे.

शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. अपघातग्रस्तांचा मदतीसाठी पुढे येणाऱ्या संस्थांनी देखील स्वप्नालीच्या वैद्यकीय मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे चेअरमन रवींद्र चोरघे यांनी केले आहे.

Web Title: A trauma-injured student needs help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.