'शिंदे साहेब विनंती आहे' असे म्हणत आत्महत्या; सावकाराच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:26 IST2025-06-04T12:26:02+5:302025-06-04T12:26:20+5:30
कुटुंबीय गावावरून परत आल्यानंतर त्यांनी सोमवारी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली

'शिंदे साहेब विनंती आहे' असे म्हणत आत्महत्या; सावकाराच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: सावकाराच्या चक्रवाढ व्याजाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरणे येथे समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या व्यक्तीने ‘प्लीज, एकनाथ शिंदे साहेब तुमच्याकडे विनंती आहे,’ असे लिहीत या प्रकरणात दोषी सावकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आत्महत्या करणाऱ्याचे नाव रवींद्र शिंदे (वय ३९) असे कोपरखैरणे सेक्टर १९ परिसरातील राहत्या इमारतीच्या छतावर गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. सकाळी या घटनेची नोंद केल्यानंतर त्यांचा मृतदेह गावी नेण्यात आला होता. कुटुंबीय गावावरून परत आल्यानंतर त्यांनी सोमवारी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली.
कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- पोलिसांनी प्रथमेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या रवींद्र शिंदे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती.
- त्यामुळे त्यांनी सांताक्रुझ येथील प्रथमेश चव्हाण याच्याकडून काही रक्कम १२.५ टक्के व्याजाने घेतली होती. मात्र, पैसे दिल्यानंतर चव्हाण हा ३० टक्के व्याज आकारत होता, असे समोर आले.
- या चक्रवाढ व्याजाला आणि त्याच्या त्रासाला कंटाळून रवींद्र यांनी आत्महत्या केल्याचे चिठ्ठीतून समोर आले आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- याच्या चौकशीतून सावकारी कर्जाची आणखी प्रकरणं उघडकीस येण्याची शक्यता आहे.