हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप
By कमलाकर कांबळे | Updated: December 26, 2025 06:28 IST2025-12-26T06:28:18+5:302025-12-26T06:28:40+5:30
वाहतुकीचे नियोजन हा मोठा मुद्दा मानला जात होता. अटल सेतू, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग आदी प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलिस, सिडको, इतर यंत्रणांनी काटेकोर व्यवस्था केली होती. दिशादर्शक फलक, स्वतंत्र लेन व मनुष्यबळामुळे वाहतूक कोंडी टळली.

हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप
- कमलाकर कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : २५ डिसेंबर २०२५ हा दिवस नवी मुंबईच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला गेला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुले होताच पहिल्याच दिवशी विमानतळावर उत्साह, कुतूहल दिसले. पहिल्या उड्डाणाचा साक्षीदार होण्याचा अभिमान अनेकांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
व्यावसायिक शुभारंभाच्या पहिल्या दिवशी सर्व यंत्रणांची कसोटी लागली. मात्र, चेक-इन, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग आणि बॅगेज हाताळणी या सर्व प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या.
वाहतुकीचे नियोजन हा मोठा मुद्दा मानला जात होता. अटल सेतू, सायन-पनवेल महामार्ग, पामबीच मार्ग आदी प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलिस, सिडको, इतर यंत्रणांनी काटेकोर व्यवस्था केली होती. दिशादर्शक फलक, स्वतंत्र लेन व मनुष्यबळामुळे वाहतूक कोंडी टळली.
पहिले विमान बंगळुरूहून, पहिले प्रस्थान हैदराबादला
विमान कंपन्या : इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस, आकासा एअर, स्टार एअर
पहिले आगमन : ६ई ४६० (बंगळुरू) सकाळी ८
पहिले प्रस्थान : ६ई ८८२ (हैदराबाद) सकाळी : ८:४०
४ हजार प्रवाशांनी केला पहिल्याच दिवशी प्रवास
पहिल्याच दिवशी विमानतळावरून ४८ विमानांची वाहतूक झाली असून, सुमारे ४ हजार जणांनी प्रवास केला.
तत्पूर्वी बंगळुरू येथून आलेल्या इंडिगोच्या विमानाला पारंपरिक वॉटर कॅनन सलामी देण्यात आली.
प्रवाशांचा उत्साह, कर्मचाऱ्यांकडून स्वागत
प्रवाशांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. अनेकांच्या हातात दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ, असे फलक होते. टर्मिनलमध्ये अनेकजण छायाचित्रे व व्हिडीओ काढताना दिसून आले. विमानतळ प्रशासनाकडून प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. काही प्रवाशांना स्मृतिचिन्हे देत या ऐतिहासिक दिवसाची आठवण जपण्यात आली.
पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी आखला बेत
अनेक प्रकल्पग्रस्तांनी पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी नवी मुंबई ते गोवा, नवी मुंबई ते हैदराबाद आणि दिल्ली ते नवी मुंबई अशा प्रवासाचे पूर्वनियोजन केले होते.
अनेकांनी पारंपरिक आगरी कोळी वेशभूषा परिधान करून ‘दिबां’चे पोस्टर विमानतळात झळकावले.
तसेच उडणारे पहिले विमान पाहण्यासाठीही कळंबोली ‘जेएनपीए’ मार्गावर गर्दी झाली होती.