‘त्या’ मुली अद्यापही सुधारगृहातच
By Admin | Updated: September 14, 2015 04:11 IST2015-09-14T04:11:52+5:302015-09-14T04:11:52+5:30
नेरूळ पोलिसांनी आग्य्राच्या कुंटणखान्यातून नाट्यमयरीत्या सुटका केलेल्या त्या पाच मुलींच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेण्यास अद्याप कोणीही पुढे आलेले नाही.

‘त्या’ मुली अद्यापही सुधारगृहातच
नवी मुंबई : नेरूळ पोलिसांनी आग्य्राच्या कुंटणखान्यातून नाट्यमयरीत्या सुटका केलेल्या त्या पाच मुलींच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेण्यास अद्याप कोणीही पुढे आलेले नाही. त्यामुळे या पीडित मुलींना मागील महिन्याभरापासून सुधारगृहातच राहावे लागत आहे. तर त्यांच्या पालकांचा शोध लागलेला नसून सामाजिक संस्थांनी देखील पुनर्वसनासाठी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे.
आग्रा येथील कश्मिरी बाजार परिसरातील कुंटणखान्यावर नेरूळ पोलिसांनी नाट्यमयरीत्या छापा टाकून २१ मुलींची सुटका केलेली आहे. या मुलींना देशभरातील विविध ठिकाणावरुन पळवून आणल्यानंतर त्यांच्याकडून देहविक्री करुन घेतली जात होती. त्यापैकी पाच मुली महाराष्ट्रातील आहेत. त्यानुसार इतर राज्यातील मुली संबंधित
पोलिसांच्या ताब्यात देवून नेरुळ पोलिसांनी पाच मुलींना महाराष्ट्रात आणले होते.
या पीडित मुली पुणे, कल्याण, लातूर व उस्मानाबादच्या राहणाऱ्या आहेत. त्यांच्यावर एक ते सात वर्षांपासून लैंगिक अत्याचार सुरु होता. तर प्रयत्न करूनही नरकयातनेतून त्यांची सुटका होत नव्हती.
अखेर नेरुळ पोलिसांनी त्यांची सुटका केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचा शोध महत्त्वाचा होता. त्यानुसार मुलींनी राहत्या ठिकाणाची माहिती दिल्यानंतर संबंधित पोलिसांना नेरुळ पोलिसांनी पत्र पाठवून या प्रकाराची माहिती दिलेली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटूनही पाचही मुलींच्या राहत्या ठिकाणच्या पोलिसांकडून प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे या मुलींच्या कुटुंबातील व्यक्तींचा शोधात नेरुळ पोलिसांनाच जंग पछाडावी लागणार आहे.
पालकांचा शोध लागल्यानंतरही ते मुलींना स्वीकारतील का, असाही प्रश्न पोलिसांना सतावत आहे. यामुळे पाचही मुलींच्या पुनर्वसनासाठी समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन देखील नेरुळ
पोलिसांनी केले होते. यानंतरही कोणतीच संस्था पुढे न आल्याने आग्रा येथून सुटका झालेल्या मुलींना सुधारगृहातच खितपत राहावे लागत आहे.
नरकयातना सोसल्यानंतर कुटुंबीयांकडे परत देण्याऐवजी पुनर्वसन व्हावे अशी त्या मुलींनी इच्छा आहे. परंतु ऐरवी महिलांवरील अत्याचाराविषयी गळा काढणाऱ्या एकाही समाजसेवी संस्थेने त्यांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे सुधारगृहाशी
संलग्न समाजसेवकांच्या भूमिकेवर त्यांची नजर लागली आहे.
(प्रतिनिधी)