पिण्यासाठी पाणी नाही : ‘फिफा’च्या बंदोबस्तातील पोलिसांची गैरसोय, आठ तासांनंतर मिळाला नाष्टा; प्रेक्षकांचीही गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 02:17 AM2017-10-09T02:17:56+5:302017-10-09T02:18:13+5:30

फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्याचा फटका बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना बसला. दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना पिण्यासाठी पाणीही मिळाले नाही.

 There is no water for drinking: Disadvantages of police in FIFA closure; Disadvantage of audiences | पिण्यासाठी पाणी नाही : ‘फिफा’च्या बंदोबस्तातील पोलिसांची गैरसोय, आठ तासांनंतर मिळाला नाष्टा; प्रेक्षकांचीही गैरसोय

पिण्यासाठी पाणी नाही : ‘फिफा’च्या बंदोबस्तातील पोलिसांची गैरसोय, आठ तासांनंतर मिळाला नाष्टा; प्रेक्षकांचीही गैरसोय

Next

नामदेव मोरे 
नवी मुंबई : फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्याचा फटका बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना बसला. दुपारी १२ ते रात्री १० पर्यंत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना पिण्यासाठी पाणीही मिळाले नाही. ६ तास उभे राहिल्यानंतर नाष्ट्यासाठी पुलाव देण्यात आला, पण त्यानंतरही पिण्यासाठी पाणी मिळाले नसल्याने पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल सामने होत आहेत. डॉ.डी.वाय. पाटील मैदानामध्ये ६ आॅक्टोबरला झालेल्या पहिल्या दोन सामन्यांसाठी देश- विदेशातील क्रीडाप्रेमी व खेळाडू उपस्थित होते. जवळपास ४० हजार प्रेक्षक सामना पाहण्यासाठी येणार असल्याने स्टेडियममध्ये व बाहेरही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्टेडियम परिसरामध्ये जवळपास १२०० अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले होते.
वाहतूक व्यवस्थापनापासून कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही. चेंगराचेंगरी किंवा इतर कोणतीही दुर्घटना होवू नये यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून गस्त घालत होते.
सामन्यादिवशी दुपारी १२ वाजता पोलीस बंदोबस्तासाठी स्टेडियम परिसरामध्ये आले. दोन्ही सामने संपल्यानंतर रात्री दहा वाजता त्यांची सुटका झाली.
जवळपास दहा तास बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाºयांना पिण्यासाठी पाणीही उपलब्ध करून देण्यात आले नाही. बंदोबस्तासाठी नेमून दिलेल्या जागेवरून न हलण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी आहेत का व दिलेले काम योग्य पद्धतीने करत आहेत का याकडेही लक्ष देण्यासाठी यंत्रणा होती. सामना सुरळीत व्हावा व कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी सर्वच अधिकारी, कर्मचाºयांनी त्यांची जबाबदारी चोखपणे बजावली.
बंदोबस्तावर आलेले पोलीस दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत उकाड्यामुळे हैराण झाले व नंतर पावसामुळे. या दरम्यान अनेकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले नाही. पोलिसांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी काहीही उपाययोजना आयोजकांनी केली नव्हती. तब्बल सहा तासांनंतर कर्मचाºयांना नाष्ट्यासाठी पुलाव देण्यात आला. दिवसभर उपाशी असलेल्या कर्मचाºयांनी नाष्टा केला, परंतु नंतर पिण्यासाठी पाणी मिळाले नसल्याने कर्मचाºयांनी नाराजी व्यक्त केली.
अखेर अनेकांनी स्टेडियममधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून पाणी बॉटल विकत घेतल्या. अनेकांनी एल. पी. ब्रीजखाली जावून हॉटेलमधून पाणी आणून सहकाºयांना दिले. या गैरसोयीविषयी पोलिसांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली तरी खासगीमध्ये मात्र या प्रकाराविषयी तीव्र शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाºयांना किमान पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title:  There is no water for drinking: Disadvantages of police in FIFA closure; Disadvantage of audiences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.