नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 10:52 IST2025-12-25T10:51:52+5:302025-12-25T10:52:37+5:30
ज्या क्षणाची नवी मुंबईकर गेल्या अनेक वर्षांपासून चातकासारखी वाट पाहत होते, तो ऐतिहासिक क्षण अखेर आला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
नवी मुंबईच्या शिरपेचात आज मानाचा तुरा रोवला जात आहे. ज्या क्षणाची नवी मुंबईकर गेल्या अनेक वर्षांपासून चातकासारखी वाट पाहत होते, तो ऐतिहासिक क्षण अखेर आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज, गुरुवारपासून अधिकृतपणे व्यावसायिक विमान वाहतुकीला सुरुवात होत आहे. यामुळे आता नवी मुंबई जगाच्या नकाशावर एअर कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून अधिक ठळकपणे उमटणार आहे.
ड्रोन शोने उजळले आकाश
या ऐतिहासिक सोहळ्याची पूर्वसंध्या अत्यंत दिमाखदार साजरी करण्यात आली. विमानतळ कार्यान्वित होण्याच्या आनंदात बुधवारी रात्री तब्बल १,५१५ ड्रोन्सचा वापर करून आकाशात एक भव्य 'ड्रोन शो' आयोजित करण्यात आला होता. या चित्तवेधक शोने नवी मुंबईकरांचे डोळे दिपवून टाकले. या ड्रोन शोच्या माध्यमातून विमानतळाच्या प्रवासाची झलक आकाशात साकारण्यात आली होती.
पहिल्याच दिवशी धावपळ!
सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, आज पहिल्याच दिवशी या विमानतळावरून १५ विमाने उड्डाण करतील. दिवसभरात एकूण ३० 'एअर ट्रॅफिक मूव्हमेंट्स' (येणारी आणि जाणारी विमाने) होतील. या विमानतळाच्या सुरू होण्यामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांचा आणि विमानांचा अतिरिक्त ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे.
२०१८ मध्ये झाला होता शिलान्यास
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कल्पना सर्वप्रथम 'सिडको'ने मांडली होती. त्यानंतर २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. सर्व तांत्रिक प्रक्रिया आणि चाचण्या यशस्वी झाल्यानंतर, याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानांच्या हस्ते या विमानतळाचे लोकार्पण करण्यात आले होते. आजपासून येथे प्रवाशांची ये-जा सुरू झाल्याने एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे.
प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर
या विमानतळामुळे केवळ नवी मुंबईच नाही, तर ठाणे, रायगड आणि पुणेकरांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईला जाण्याचा त्रास वाचणार असून वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होणार आहे. अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेले हे विमानतळ भविष्यात देशातील महत्त्वाच्या हवाई केंद्रांपैकी एक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.