मोरा बंदरात बोट रुतली चिखलात! प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा भाविकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 14:06 IST2024-03-09T14:05:27+5:302024-03-09T14:06:26+5:30

महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर ये-जा करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदर, पोलिस, शासकीय, निमशासकीय सुरक्षा यंत्रणा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आली होती.

The boat stuck in the mud in Mora port Devotees are affected by the unplanned affairs of the administration | मोरा बंदरात बोट रुतली चिखलात! प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा भाविकांना फटका

मोरा बंदरात बोट रुतली चिखलात! प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचा भाविकांना फटका

उरण :  महाशिवरात्रीनिमित्ताने घारापुरी बेटावर ये-जा करणाऱ्या हजारो शिवभक्तांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. शुक्रवारी दुपारी ४ नंतर तर काही बोटी उरण-मोरा बंदरातच चिखलात रुतून बसल्यामुळे आणि ठरवून दिलेल्या एकेरी ६५ रुपये तिकिटाऐवजी बोट चालकांकडून ७०-८० रुपये वसूल केल्याने घारापुरी बेटावर येणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावा लागला. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र शिवभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

महाशिवरात्रीनिमित्ताने बेटावर ये-जा करणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदर, पोलिस, शासकीय, निमशासकीय सुरक्षा यंत्रणा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आली होती. राजबंदर जेट्टीवर दुपारी ४ नंतर प्रशासनाचे नियोजन ढासळल्याने जेएनपीए व उरण-मोराकडे निघालेल्या भाविकांना एका बोटीवरून दुसऱ्या बोटीवर जाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. 

मनमानीपणे तिकिटाची आकारणी
-  ग्रामपंचायतीच्या पत्रानंतर महाशिवरात्रीला बेटावर येणाऱ्या भाविकांसाठी बंदर विभागाकडून या वर्षीही सुमारे ३०० ते ५०० प्रवासी वाहतूक क्षमतेच्या सहा मच्छीमार बोटींची व्यवस्था केली होती.
-   यासाठी बंदर विभागाने एकेरीसाठी ६५ तर दुहेरी परतीच्या प्रवासासाठी १३० असा तिकीट दर ठरवून दिला होता. मात्र तिकीट दर ठरवून दिल्यानंतरही बोटचालकांकडून एकेरीसाठी ७०-८० रुपये तर परतीच्या प्रवासासाठी १४०-१६० रुपयांपर्यंत  मनमानीपणे तिकीट दर आकारणी करीत होते, याचाही भाविकांना भुर्दंड पडला.

-   बोटीत अडकून पडलेल्या महिला, आबालवृद्धांचे अतोनात हाल झाले. हा गोंधळ संपतो ना संपतो तोपर्यंत समुद्रातील ओहोटीमुळे मोरा बंदरात भाविकांना उतरण्यासाठी व बोटी लागण्यासाठी पाणीच नसल्याने काही बोटी मोरा बंदरापासून अर्धा किमी अंतरावर चिखलात रुतून बसल्या. 
-   मोठ्या मुश्किलीने खचाखच भाविकांनी भरलेल्या राम अयोध्या आणि जय गणेश या बोटी बंदरापर्यंत पोहोचल्या. 
-   प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराबाबत शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
 

Web Title: The boat stuck in the mud in Mora port Devotees are affected by the unplanned affairs of the administration