‘तो’ लेडीज बार दुसऱ्या दिवशीही सुरू, मनसेच्या आंदोलनाची बारचालकांना भीती नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:41 IST2025-08-05T10:40:42+5:302025-08-05T10:41:04+5:30
मनसेच्या आंदोलनाची परिसरातील बारचालक धसका घेतील, अशी चर्चा होती. मात्र, या प्रकाराच्या दुसऱ्याच दिवशी तोडफोड झालेला नाइट रायडर्स बार आणि इतर लेडीज बार सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले.

प्रतिकात्मक फोटो
पनवेल : लेडीज बारबाबतच्या राज ठाकरे यांच्या वक्तव्याची दखल घेऊन मनसैनिकांनी २ ऑगस्ट रोजी रात्री १२:००च्या सुमारास पनवेल तालुक्यातील कोन गावाजवळील नाइट रायडर्स बारवर हल्ला चढवला. खळ्ळखट्याक करून बारचे नुकसान केले. मनसेच्या आंदोलनाची परिसरातील बारचालक धसका घेतील, अशी चर्चा होती. मात्र, या प्रकाराच्या दुसऱ्याच दिवशी तोडफोड झालेला नाइट रायडर्स बार आणि इतर लेडीज बार सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले.
पनवेलमधील लेडीज सर्व्हिस बार नेहमी चर्चेत असतात. ऑर्केस्ट्रॉ बारच्या नावाखाली याठिकाणी सुरू असलेले अश्लील वर्तन चालते, हे लपून राहिलेले नाही. आजवर शेकडो कारवाया पोलिस, उत्पादन शुल्क विभागाने या बारवर केलेल्या आहेत. पूर्ण पनवेलमध्ये १५ ते २० लेडीज सर्व्हिस बार आहेत. मनसेने ज्या कोन गावाजवळ बार फोडले, त्या परिसरातच ७ लेडीज सर्व्हिस बार आहेत. यामध्ये गोल्ड डीगर, साईनिधी, कपल, टायटन, क्रेजी बॉइस आदी बारचा समावेश आहे. मात्र, ज्या नाइट रायडर्स बारवर मनसेने हल्ला चढवला, तो बार वगळून इतर बारच्या जागांचे भाडे स्थानिकांना मिळते. केवळ नाइट रायडर्स बारच्या जागेचा मालक स्थानिक नसल्याने त्या बारवर मनसैनिकांनी हल्ला चढविल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसेचे बारवरील आंदोलन पुढे सुरूच राहणार का? अशी चर्चा आहे. दरम्यान, संपूर्ण यंत्रणांना हाताशी धरलेल्या बारचालकांना कोणाचीच भीती नसल्याचे स्पष्ट झाले.
मनसैनिकांना जामीन मंजूर
बार तोडफोडप्रकरणी सातही मनसैनिकांना पनवेल न्यायालयाने सोमवारी जामीन दिला. पीआर बाँडवर न्यायालयाने हा जामीन दिला असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन घाटगे यांनी दिली.
कोन गावाजवळ केलेल्या आंदोलनाबाबत स्थानिक मनसे नेते केसरीनाथ पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी न्यायालयात असल्याचे सांगून या विषयात बोलणे टाळले.