प्राची सोनवणे / नवी मुंबईगरब्यालाही यंदा ग्लॅमरस लूक आला असून त्याचाच एक प्रकार अंगावर कोरलेला ‘टॅटू’. अंगावर गोंदवून घेणे हा तसा भारतातील जुनाच प्रकार आहे. नवरात्रौत्सवानिमित्त शहरातील टॅटू मेकिंग सेंटरच्या बाहेर तरुणांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या आहेत. फॅशन आयकॉन मानला जाणारा हा टॅटू अंगावर सर्वच वयोगटांमध्ये लोकप्रिय झाला आहे.कायमस्वरूपी टॅटू काढण्यासाठी प्रत्येक इंचाला १५०० ते १९०० रुपये मोजावे लागत असून बॉडी पिअर्सिंगसाठी ६०० ते ९००रुपये इतका खर्च येतो. विविध प्रकारचे कायमस्वरूपी टॅटू अंगावर गोंदवून घेताना प्रचंड वेदना तर होतेच, परंतु कित्येक तासही खर्ची होतात. टॅटू त्वचेच्या सात लेअरपैकी तीन लेअर मशीनने कट करून काढले जातात. हवी ती डिझाइन आणि आपल्याला हवा तो फोटो टॅटू म्हणून अंगावर काढता येऊ शकतो. हात, दंड, मान, मणका आणि पोट या अवयवांवर टॅटू काढण्याची क्रेझ वाढली आहे. कायमस्वरूपी टॅटूबरोबर तात्पुरते टॅटूही बाजारात मिळतात. हे १५-२० दिवस अंगावर राहतात. प्रत्येक-वेळी आपल्याला हवा तो टॅटू तात्पुरत्या स्वरूपात काढून घेता येत असल्याने अशा टॅटूंना तरुण अधिक पसंती देतात. टॅटू काढण्यासाठी जितका खर्च तो पुसून टाकायचा असेल तर त्यापेक्षा जास्त खर्च करावा लागतो. म्हणूनच कायमस्वरूपी टॅटू काढण्यापेक्षा तात्पुरत्या टॅटूला पसंती मिळत आहे. तात्पुरते टॅटू काढण्यात राशीचे चिन्ह, ड्रॅगन, गुलाब, स्वत:चे नाव काढून घेतले जातात. विविध प्रकारचे रंगीत टॅटू हा सुध्दा लोकप्रिय आहे. टॅटूसाठी विशेष रंग वापरले जातात.
तरुणांमध्ये टॅटूची क्रेझ
By admin | Updated: October 10, 2016 03:43 IST