तळोजा एमआयडीसी खड्डेमुक्त होणार; २१ किलोमीटर रस्त्याचे काँक्रेटीकरण, २०० कोटी रूपये खर्च
By नामदेव मोरे | Updated: January 19, 2024 19:44 IST2024-01-19T19:42:18+5:302024-01-19T19:44:34+5:30
तळोजा औद्योगीक वसाहतीमधील रस्ते लवकरच खड्डेमुक्त होणार आहेत.

तळोजा एमआयडीसी खड्डेमुक्त होणार; २१ किलोमीटर रस्त्याचे काँक्रेटीकरण, २०० कोटी रूपये खर्च
नवी मुंबई: तळोजा औद्योगीक वसाहतीमधील रस्ते लवकरच खड्डेमुक्त होणार आहेत. शासनाने २१ किलोमीटर लांबीच्या प्रमुख रस्त्यांचे काँक्रेटीकरण करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी २०० कोटी रूपये खर्च होणार आहेत. काँक्रेटीकरणामुळे या परिसरातील उद्योजक व वाहतूकदारांच्या गैरसोयी दूर होणार आहेत. शासनाने पनवेल तालुक्यामधील तळोजा येथे ८७६ हेक्टर जमीनीवर एमआयडीसी उभारली आहे. या परिसरामध्ये १६२२ औद्योगीक भुखंड असून यामध्ये अनेक प्रमुख उद्योगांचाही समावेश आहे. एमआयडीसीमधील रस्त्यांवर वारंवार खड्डे पडत असल्यामुळे वर्षभर वाहतुकीला अडथळे निर्माण होते.
तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी व पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर प्रमुख रस्त्यांचे काँक्रेटीकरण केले आहे.उर्वरीत रस्त्यांचेही काँक्रेटीकरण करण्याची मागणीही केली होती. यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेवून निवेदन दिले होते. शासनाने या परिसरातील २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रेटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. एल. एम. व्ही. टी, केमीकल व न्यू केमीकल झोनमधील रस्त्यांचे काँक्रेटीकरण केले जाणार आहे. या कामासाठी २०० कोटी रूपये खर्च होणार आहे.
काँक्रेटीकरणाचे काम सुरू होणार असल्यामुळे व्यवसायीकांनी समाधान व्यक्त केले आहे. सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रेटीकरण होणार असल्यामुळे आता खड्यांची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. तळोजा इंडस्ट्रीयल असोसिएशनने उद्योगमंत्री, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण यांच्यासह सर्व अधिकाऱ्याचेही आभार मानले आहेत.