शस्त्रक्रियेत हलगर्जी भोवली; पाच जणांनी गमावली दृष्टी; अहवालानंतर डॉक्टर पितापुत्रावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:46 IST2025-08-06T13:44:40+5:302025-08-06T13:46:18+5:30
वाशी येथील पंडित आय सर्जरी अँड लेजर हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.

शस्त्रक्रियेत हलगर्जी भोवली; पाच जणांनी गमावली दृष्टी; अहवालानंतर डॉक्टर पितापुत्रावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नवी मुंबई : डोळ्यांची शस्त्रक्रियेतील हलगर्जी केल्याने पाच जणांची दृष्टी गेल्याचा ठपका ठेऊन डॉक्टर पितापुत्रावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबमध्ये त्यांनी वाशीतील एका खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रिया केल्या होत्या. मात्र, त्यानंतर संसर्ग झाल्याने संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक विभागाच्या अहवालावरून हा गुन्हा दाखल केला आहे.
वाशी येथील पंडित आय सर्जरी अँड लेजर हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. डिसेंबर २०२४ मध्ये त्याठिकाणी शहराच्या विविध भागातील काही व्यक्तींनी डोळ्यांशी संबंधित आजारावर उपचार घेतले होते. त्यामध्ये काहींच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली होती. त्यापैकी पाच जणांना शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांचा संसर्ग होऊन त्यांची दृष्टी गेली होती. यामुळे त्यांनी शस्त्रक्रियेत झालेल्या हलगर्जी विरोधात वाशी पोलिसांकडे तक्रार केली होती.
सुडोमोनास विषाणूंच्या बाधेमुळे गंभीर परिणाम
याबाबत पोलिसांनी जिल्हा शल्य चिकित्सक विभागाला कळवून अहवाल मागवला होता. त्याचा अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेत हलगर्जी झाल्याचे नमूद केले आहे.
तर शस्त्रक्रियेनंतर संबंधितांच्या डोळ्यांना सुडोमोनास विषाणूंच्या बाधेमुळे हा गंभीर आजार झाल्याचेही अहवालावरून स्पष्ट झाले. त्यावरून उपचारानंतर दृष्टी गमावलेल्या पाच जणांच्या तक्रारीवरून डॉ. चंदन पंडित व डॉ. डी. व्ही. पंडित या पितापुत्रांवर वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी डॉक्टर चंदन पंडित महापालिकेच्या सेवेत
गुन्हा दाखल झालेले डॉ. चंदन पंडित हे महापालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयात नोकरीला आहेत. यानंतरही ते वडिलांच्या नावे वाशीत असलेल्या रुग्णालयात प्रॅक्टिस करत होते.
ही बाब प्रशासनाच्या दृष्टीतून सुटली कशी, याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान ऐरोली रुग्णालयात त्यांच्याकडून रुग्णांना जाणीवपूर्वक बाहेरची औषधे लिहून दिली जायची अशाही तक्रारी समोर येत आहेत.
नेमके घडले काय?
डॉ. डी. व्ही. पंडित हे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ म्हणून परिचित आहेत. दृष्टी कमकुवत झाल्याने ते शस्त्रक्रिया करत नाहीत. यामुळे रुग्णालयातील शस्त्रक्रिया मुलगा डॉ. चेतन हाताळत होता, अशी माहिती समोर आली. त्यातूनच डिसेंबरमध्ये शस्त्रक्रियेनंतर या पाच रुग्णांना संसर्ग होऊन दृष्टी गमवावी लागली.