Video: पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरून आत्महत्येचा प्रयत्न; कळंबोली येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 14:13 IST2019-06-22T14:04:56+5:302019-06-22T14:13:28+5:30
पोलिसाने जीवावर उदार होऊन वाचवले प्राण

Video: पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरून आत्महत्येचा प्रयत्न; कळंबोली येथील प्रकार
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - कळंबोली येथील पोलीस मुख्यालयाच्या इमारतीवरून एक व्यक्ती आत्महत्येच्या प्रयत्नात होती. तीन मजली इमारतीवरील पाण्याच्या टाकीवर चढून ही व्यक्ती बसली होती. मात्र एका पोलिसाने शिताफीने त्याच्यावर झडप टाकून स्वतःसह त्याला टेरेसवर झोकून दिले. यामध्ये नैराश्यात आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीचे प्राण वाचले असून त्याला वाचवणारा पोलीस जखमी झाला आहे.
शनिवारी सकाळी 10 वाजण्यास हा प्रकार घडला. पोलीस मुख्यालयाच्या तीन मजली इमारीवर एक व्यक्ती चढली होती. तो टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येच्या प्रयत्नात होता. याची माहिती मिळताच कळंबोली पोलीस तसेच मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी तिथे धाव घेतली. समजूत काढून देखील तो खाली उतरत नसल्याने त्याने खाली उडी टाकल्यास अलगत पकडण्याची तयारी पोलिसांनी केली होती. मात्र त्यातही अधिक धोका होता.
त्यामुळे टेरेसवर गेलेल्या पोलिसांनी एका बाजूने त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याच वेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने पाठीमागून पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीवर झेप टाकून स्वतसोबत त्याला टेरेसवर झोकून दिले. त्यानंतर सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याला दुखापत झाली असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती मूळची बीडची असून त्याच्या नैराश्याचे कारण कळू शकलेले नाही. योगेश चांदणे (30) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर क्यूआरटीचे पोलीस शिपाई स्वप्नील मंडलिक यांनी त्यांचे प्राण वाचवले.