- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : सिडकोच्या कार्मिक विभागात सहायक विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकाºयाने बुधवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मयूर अगवणे असे या अधिकाºयाचे नाव आहे. पत्नीच्या प्रसंगावधानाने त्यांचे प्राण वाचले. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांच्या त्रासाला कंटाळून मयूर यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. या घटनेची फारशी चर्चा झाली नसली तरी त्यामुळे सिडको कर्मचारीवर्गात मात्र खळबळ उडाली आहे.
राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे; परंतु त्याचबरोबर भ्रष्टाचाराविषयी चर्चेतही सिडकोचा क्रमांक वरचा राहिला आहे. प्रत्येक विभागात फोफावलेल्या भ्रष्टाचारी मनोवृत्तीमुळे आपल्या हाताखालच्या कर्मचाºयांचे शोषण केले जात आहे. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे; परंतु कोणी वाच्यता करायला धजावत नाही. मयूर अगवणे हे कार्मिक विभागात सहायक विकास अधिकारी म्हणून काम करीत आहेत.
कार्यालयीन कामाचा ताण वाढल्याने मागील काही महिन्यांपासून ते अस्वस्थ होते, त्यामुळे अनेकदा नोकरी सोडण्याचा विचारही त्यांनी आपले सहकारी व कुटुंबीयांकडे बोलून दाखविल्याचे समजते. याच मनस्थितीतून त्यांनी बुधवारी रात्री आपल्या घरातील बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गळफास लावताना स्टुलचा आवाज आल्याने बाजूच्या रूममध्ये झोपलेल्या त्यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी तातडीने मयूर यांच्या खोलीकडे धाव घेतली. क्षणाचा विलंब न लावता त्यांनी पंख्याला अडकवलेली दोर कापून बेशुद्ध अवस्थेतील मयूर यांना खाली उतरविले. त्यानंतर त्यांना सीबीडी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तीन दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केल्यानंतर शनिवारी त्यांना घरी सोडून देण्यात आले. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
संबंधित प्रकरणाची कोणतीही माहिती अद्याप आपल्याकडे आलेली नाही. अगवणे नामक अधिकाºयाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल, तर हा पोलीस तपासाचा भाग आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर उपलब्ध माहितीच्या आधारे आवश्यक ती कारवाई केली जाईल.- लोकेश चंद्र,व्यवस्थापकीय संचालक, सिडको