संचारबंदीमुळे सलग पाच दिवस रुग्णवाढ रोखण्यात यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 12:32 AM2021-04-21T00:32:18+5:302021-04-21T00:32:31+5:30

रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली : निर्बंधांमुळे साखळी होते आहे खंडित

Success in preventing outbreak for five days in a row | संचारबंदीमुळे सलग पाच दिवस रुग्णवाढ रोखण्यात यश 

संचारबंदीमुळे सलग पाच दिवस रुग्णवाढ रोखण्यात यश 

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राज्य शासनाने लागू केलेली संचारबंदी व कडक निर्बंध यामुळे नवी मुंंबईमध्ये कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. सलग पाच दिवस रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ११,०४५ वरून १०,३३७ वर आली आहे.


नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. महानगरपालिका प्रशासनाने शहरात संचारबंदी व कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणारांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. दहा दिवसांपूर्वी एकाच दिवशी १४०० रुग्ण वाढू लागले होते; परंतु मागील पाच दिवसांमध्ये सातत्याने नवीन रुग्णांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. १५ एप्रिलला १०३६ रुग्ण वाढले होते व १४६५ जण बरे झाले होते. सोमवारी ७५६ नवीन रुग्ण वाढले होते व ९४३ जण बरे झाले 
होते. पाच दिवसांमध्ये ४६२३ नवीन रुग्ण वाढले व ६०२५ जण बरे झाले आहेत.


महानगरपालिकेला कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. जीवनावश्यक वस्तू वगळून इतर दुकाने बंद ठेवल्यामुळे रोडवरील अनावश्यक गर्दी कमी होऊ लागली आहे. गर्दी करणाऱ्यांवर कारवाई होऊ लागली आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीही नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे. नियमांचे पालन केले तर कोरोनाची साखळी खंडित करणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मृत्यूचा आकडा वाढतोय
मागील पाच दिवसांमध्ये नवीन रुग्णांचे प्रमाण कमी झाले असले व कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे; परंतु दुसरीकडे मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे चिंताही वाढू लागली आहे. पाच दिवसांत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतिदिन सरासरी ८ जणांचा मृत्यू होत आहे.

Web Title: Success in preventing outbreak for five days in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.