विशेष महासभेत आरोग्य यंत्रणेचा होणार पंचनामा

By Admin | Updated: September 14, 2015 04:13 IST2015-09-14T04:13:17+5:302015-09-14T04:13:17+5:30

शहरात डेंग्यू, मलेरियाने थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्यसेवा देण्यात पालिका प्रशासनास अपयश आले आहे

Special arrangements will be made in the General Assembly | विशेष महासभेत आरोग्य यंत्रणेचा होणार पंचनामा

विशेष महासभेत आरोग्य यंत्रणेचा होणार पंचनामा

नामदेव मोरे, नवी मुंबई
शहरात डेंग्यू, मलेरियाने थैमान घातले असून आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्यसेवा देण्यात पालिका प्रशासनास अपयश आले आहे. नागरिकांसह लोकप्रतिनिधींमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्याचे पडसाद सोमवारी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत उमटणार आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाचे नगरसेवक आरोग्य यंत्रणेचा पंचनामा करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाणीपुरवठा, नागरी स्वच्छता अभियान, अत्याधुनिक क्षेपणभूमी, सी - टेक धर्तीवर आधारित हायटेक मलनिस्सारण केंद्र व इतर अनेक गोष्टींसाठी महापालिकेला राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. अल्पावधीमध्ये सर्वाधिक मानाचे पुरस्कार मिळविणारी महापालिका म्हणून नवी मुंबईची ओळख निर्माण झाली आहे. केंद्र शासनाने केलेल्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणामध्ये देशात तिसरा व राज्यात पहिला क्रमांकही नवी मुंबईस मिळाला आहे. एकीकडे स्वच्छ शहर अशी बिरुदावली मिरविण्यात येत असताना दुसरीकडे डेंग्यू, मलेरियाच्या साथीने थैमान घातले आहे. स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
झोपडपट्टीमधील हजारो नागरिकांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. महापालिकेच्या दिघा परिसरातील शाळेत विद्यार्थी व शिक्षकांसाठी एकही प्रसाधनगृह नाही. शहरातील नेरूळ व तुर्भे माताबाल रुग्णालये पूर्णपणे बंद आहेत. कोपरखैरणे माताबाल रुग्णालयाची वास्तू धोकादायक झाली आहे, ते रुग्णालय कोणत्याही क्षणी बंद केले जाणार आहे. ऐरोली माता बाल रुग्णालय फक्त नावापुरते सुरू आहे. फक्त वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू आहे. परंतु त्याची क्षमता फक्त ३०० बेडची आहे. १२ लाख लोकसंख्येसाठी फक्त एकच रुग्णालय असलेली नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. प्रत्येक वर्षी आरोग्य सुविधा, घनकचरा व मलनिस्सारण विभागावर जवळपास २०० कोटी खर्च होतात एवढा प्रचंड खर्च करूनही आवश्यक सुविधा मिळत नाहीत. रुग्णालयांची पूर्ण यंत्रणाच कोलमडली आहे. अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी सुरू आहे.
पूर्वी मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या डॉ. संजय पत्तीवार यांच्या कामकाजाविषयी लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी व्यक्त झाल्यानंतर त्यांची त्या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यांना अतिरिक्त आयुक्तपदी बढती दिली परंतु अनेक वर्षे काहीच काम दिले नव्हते. त्यानंतर आलेल्या डॉ. दीपक परोपकारी यांच्याविरोधात एका गटाने आवाज उठवून त्यांची उचलबांगडी करण्यास भाग पाडले. त्यांच्या जागी आलेले डॉ. रमेश निकम यांनी आरोग्य यंत्रणेचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर त्यांनाही हटवून पुन्हा त्यांच्या जागेवर परोपकारी यांची नियुक्ती केली आहे. आरोग्य विभागाला सक्षम अधिकारीच न मिळाल्यामुळे पूर्ण आरोग्य व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे.

Web Title: Special arrangements will be made in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.