शिवसेनेची बंडखोरी कायम, शहरप्रमुख विजय माने यांचा अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 03:20 IST2019-10-04T03:19:42+5:302019-10-04T03:20:21+5:30
नवी मुंबई शहरातील दोन्ही मतदारसंघामधून बंडखोरी करण्यावर शिवसेना पदाधिकारी ठाम आहेत.

शिवसेनेची बंडखोरी कायम, शहरप्रमुख विजय माने यांचा अर्ज दाखल
नवी मुंबई : शहरातील दोन्ही मतदारसंघामधून बंडखोरी करण्यावर शिवसेना पदाधिकारी ठाम आहेत. बेलापूरमधून शहरप्रमुख विजय माने यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. ऐरोलीमध्ये भाजपच्या गणेश नाईकांसमोर तगडे आव्हान देण्यासाठी विजय नाहटा यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह पक्षातीलच काही नेते करत आहेत. शुक्रवारी ते उमेदवारी अर्ज भरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
युतीचे जागावाटप जाहीर झाल्यापासून नवी मुंबईमधील शिवसेनेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कोणत्याही स्थितीमध्ये अपक्ष निवडणूक लढविण्यावर पदाधिकारी ठाम आहेत. बेलापूर मतदारसंघातून शहरप्रमुख विजय माने यांनी अर्ज भरला आहे. अजूनही शिवसेनेच्या वतीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. ऐरोली मतदारसंघातून उपनेते विजय नाहटा यांनी अर्ज भरावा यासाठी ठाणे जिल्ह्यामधील पक्षाचे नेतेही आग्रही आहेत. खासदार राजन विचारे यांनीही गुरुवारी नाहटा यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. दिवसभर विविध पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका सुरू होत्या. गणेश नाईक यांना बेलापूरमधून तिकीट मिळू नये, यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी सक्रिय होते. सेनेच्या एक बड्या नेत्यानेच नाईकांची तिकीट कापण्यासाठी ताकद पणाला लावली होती, अशी चर्चा सुरू आहे. ऐरोलीमधून गणेश नाईकांना भाजपने एबी अर्ज दिल्यानंतर तेथेही त्यांच्यासमोर तगडे आव्हान उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
ऐरोलीमधून विजय नाहटा अपक्ष अर्ज भरणार असल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती. उमेदवारीवरून शिवसेनेमध्येच दोन गट आहेत. बेलापूर मतदारसंघातील पदाधिकारी नाहटांनी बेलापूरमधून उमेदवारी लढवावी यासाठी आग्रही आहेत. ठाणे जिल्ह्यातील नेते नाहटांना ऐरोलीमधून उभे करण्यासाठी आग्रही आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत बंडखोरीविषयी अंतिम निर्णय झाला नव्हता. यामुळे शुक्रवारी प्रत्यक्ष अर्ज भरला जाणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.