भेकरवाडीतील जिल्हा परिषदेची शाळा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:07 IST2019-03-10T23:07:47+5:302019-03-10T23:07:56+5:30
विद्यार्थ्यांना आश्रमशाळेचा आधार; जिल्हा परिषदेचा उदासीन कारभार

भेकरवाडीतील जिल्हा परिषदेची शाळा बंद
पनवेल : पनवेल तालुक्यातील भेकरवाडी आदिवासी वाडीतील जिल्हा परिषद रायगडची मराठी शाळा पटसंख्येच्या अभावी बंद पडली आहे. वर्षभरापासून शाळा बंद पडल्याने येथील विद्यार्थ्यांना आदिवासी आश्रमशाळेवर अवलंबून राहावे लागत आहे, तर अनेक विद्यार्थ्यांनी घरीच थांबणे पसंत केले आहे.
पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्या शाळा बंद पडल्या आहेत. घसरती पटसंख्या हे कारण यामागे सांगितले असले तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा उदासीन कारभार या गोष्टीला कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
भेकरवाडी आदिवासी वाडीतील लहान मुलांना अंगणवाडीसाठी देखील मुकावे लागत आहे. येथील पालकांची इच्छा आहे येथील शाळा नव्याने सुरू व्हावी, जेणेकरून लहान मुलांना बालवाडीत तरी जाता येईल. मात्र, जिल्हा परिषदेमार्फत कोणतीच पावले उचलली जात नाहीत.
खारघर येथील धामोळे शाळाही बंद
भेकरवाडी येथील लोकसंख्या ३०० च्या आसपास आहे. तळोजा एमआयडीसीमधील डोंगरकपारीत हे गाव वसलेले आहे. पहिले ते चौथीपर्यंत शाळा याठिकाणी अनेक वर्षांपासून सुरू होती. खारघर शहरातील धामोळे आदिवासी वाडीतील शाळा देखील अशाच प्रकारे बंद पडली आहे