फळे पिकवण्याचा बनावट पावडरची विक्री; एपीएमसीतून साठा जप्त
By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 20, 2024 16:19 IST2024-03-20T16:19:40+5:302024-03-20T16:19:54+5:30
विक्रेत्यांसह पुरवठादारांवर गुन्हा दाखल

फळे पिकवण्याचा बनावट पावडरची विक्री; एपीएमसीतून साठा जप्त
नवी मुंबई : फळे पिकवण्यासाठी बनावट पावडर विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. सदर पावडर बनावट असल्याचे माहिती असतानाही ती पुरवल्याने व त्याची विक्री केल्याप्रकरणी संबंधितांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फळे पिकवण्यासाठी रसायनांचा वापर होत असल्याच्या तक्रारी अनेकदा येत असतात. मात्र अशा कृत्रिम पिकलेल्या फळांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रसायनांद्वारे फळे पिकवण्याला विरोध होत असतानाच फळे पिकवण्यासाठी बनावट पावडर देखील वापरली जात असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात एका कंपनीने पोलिसांकडे तक्रार केली होती.
त्यानुसार एपीएमसी पोलिसांच्या पथकाने मंगळवारी फळ मार्केट परिसरातील काही ठिकाणांची झाडाझडती घेतली. त्यामध्ये सुयोग्य स्टेशनरी, सिद्धिविनायक स्टेशनरी याठिकाणी फळे पिकवण्याची बनावट पावडर आढळून आली. कुमार बुधवानी व बंटी तलरेजा यांनी त्यांना हि पावडर उपलब्ध करून दिली होती. एपीएमसी आवारात एका कंपनीमार्फत चायना येथून मागवलेली फळे विक्रीची पावडर पुरवली जाते. त्याचीही बनावट नकल तयार करून संबंधितांकडून ते खरे असल्याचे भासवून विक्री केली जात होती. त्यांच्याकडून १ लाख ८४ हजार रुपये किमतीची बनावट पावडर हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.