हद्दीबाहेरील प्रवासासाठी पोलिसांवर ई-पासच्या अर्जांचा पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 01:29 IST2021-05-04T01:28:45+5:302021-05-04T01:29:14+5:30
नवी मुंबईतील स्थिती : अंत्यावश्यक किंवा अंत्यसंस्काराची सांगितली जाते सबब, ठोस कारण नसलेल्यांचे अर्ज नामंजूर

हद्दीबाहेरील प्रवासासाठी पोलिसांवर ई-पासच्या अर्जांचा पाऊस
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : मागील दहा दिवसात नवी मुंबईपोलिसांनी ई-पाससाठीचे १ हजार ५३३ अर्ज निकाली काढून त्यांना प्रवासाची मुभा दिली आहे. अर्जासोबत प्रवासाच्या ठोस कारणांची आवश्यक कागदपत्रे जोडल्यास दोन तासात अर्ज निकाली काढला जात आहे. मात्र अनेक जण ठोस कारण नसतानाही अर्ज करत असल्याने व काहींकडून अपुरी कागदपत्रे जोडली जात आहे. असे २० हजार ८८२ अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
कोरोनामुळे राज्यात कठोर निर्देश लागू असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक करण्यात आला आहे. त्यानंतरच संबंधितांना प्रवासाची मुभा दिली जात आहे. त्यानुसार २३ एप्रिलपासून ते ३ मे च्या पहाटेपर्यंत नवी मुंबई पोलिसांनी १ हजार ५३३ ई-पासचे वाटप केले आहे. त्यापैकी ८६५ ई-पासची मुदतदेखील संपली आहे.
या दहा दिवसांच्या कालावधीत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीबाहेर प्रवासाची अनुमती मागणारे २३ हजार ३५० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी केवळ ७० अर्ज सध्या प्रक्रियेत आहेत. उर्वरित २० हजार ८८२ अर्ज विविध कारणांनी फेटाळण्यात आले आहेत. ई-पाससाठी अत्यावश्यक सेवा, जवळच्या अथवा कुटुंबातील व्यक्तीचे निधन, वैद्यकीय किंवा लग्न ही कारणे ग्राह्य धरली जात आहेत. त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडल्यास अर्ज मंजूर केला जात आहे. मात्र शासनाने सवलत दिलेल्या या कारणांशिवाय इतर कारणांनी प्रवासासाठी ई-पास मागणाऱ्यांचे अर्ज फेटाळले जात आहेत.
किती तासांत मिळतो ई-पास
अत्यावश्यक कारणासाठी जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी पोलिसांकडून ई-पाससाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यांच्याकडे ऑनलाइन अर्ज प्राप्त होताच प्रवासाचे कारण व जोडलेली कागदपत्रे तपासून किमान दोन ते कमाल १२ तासात ई-पास दिला जात आहे. मात्र अर्ज अपुरा किंवा कागदपत्रे नसल्यास पडताळणी होईपर्यंत प्रलंबित राहू शकतो.
ई-पाससाठी असा करावा अर्ज
ई-पासकरिता अर्ज करण्यासाठी पोलिसांच्या संकेतस्थळावर लिंक देण्यात आली आहे. त्यावर अर्ज भरताना आवश्यक माहिती अचूक भरणे गरजेचे आहे. त्यानंतर अर्जदाराचा फोटो व ज्या कारणासाठी प्रवास करायचा आहे, त्याची कागदपत्रे जोडायची आहेत. सर्व माहितीची खात्री करून ई-पास दिला जातो.
तीच ती कारणे
प्रवासाचे अत्यावश्यक कारण नसतानाही अनेक जण ई-पाससाठी अर्ज करत आहेत. त्यांच्याकडून परिचयाच्या व्यक्तीच्या निधनासह वैद्यकीय कारणांचा आधार घेतला जात आहे. हे पास घेऊन अनेक जण नवी मुंबईबाहेर केवळ विश्रांतीसाठी जाऊ पाहत असल्याचेही दिसून येत आहे.
ही कागदपत्रे हवीत
शासनाने सवलत दिलेल्या कारणांसाठीच पोलिसांकडून ई-पास दिला जात आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करताना अर्ज योग्यरीत्या भरायचा आहे. तर अर्ज भरताना प्रवासाचे जे कारण नमूद केलेले असेल, त्याची कागदपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
अत्यावश्यक सुविधा पुरवत असल्यास त्याचा कागदोपत्री पुरावा. नातेवाइकाची किंवा कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचे निधन झाले असल्यास त्याचा वैद्यकीय दाखला. अथवा इतर वैद्यकीय कारणासाठी जात असल्यास त्याचाही आवश्यक पुरावा सादर करायचा आहे.
कोविड चाचणीच्या रिपोर्टला विलंब लागत असल्याने ई-पासमधून वगळण्यात आला आहे. परंतु अचानक ठरलेल्या प्रवास वगळता इतर कारणांनी प्रवासादरम्यान तो सोबत ठेवल्यास चौकशी दरम्यान गैरसोय होणार नाही.