पनवेलमध्ये पुष्पास्टाईल चोरी; दोघा तस्करांसह १० टन लाकडे हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 11:16 IST2024-02-16T11:15:47+5:302024-02-16T11:16:09+5:30
वन विभागाची कारवाई; ट्रकसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त

पनवेलमध्ये पुष्पास्टाईल चोरी; दोघा तस्करांसह १० टन लाकडे हस्तगत
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल : चिखलीवरून चिपळूण येथे अवैध पद्धतीने खैराच्या झाडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकसह खैराची लाकडे असा एकूण वीस लाखांचा मुद्देमाल पनवेल वन विभागाने बुधवारी रात्री जप्त केला.
वन विभागाची ही मोठी कारवाई असून, यात जवळपास ६ लाख रुपयांची १० टन खैराची लाकडे असल्याचे वन विभागाने सांगितले. बुधवारी उशिरा रात्री कळंबोली सर्कलजवळ पुलावर ही कारवाई करण्यात आली. मुद्देमालासह दोन आरोपींना वन वनविभागाने ताब्यात घेतले आहे. अक्रम युसूफ खान शेख (२४ कडोदे, बारदोली, सुरत) आणि मंसुरी महंमद शहीद सलीम (२७, कडोदे, सुरत) अशी दोघांची नवे आहेत.
वन विभागाला बेकायदा खैराची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वन अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे, वनपाल अशोक घुगे, वनरक्षक सिद्धेश्वर मोराळे यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी सापळा रचून ट्रकची तपासणी केली. कारवाईत जवळपास १० टन खैराची लाखो रुपयांची लाकडे जप्त केली. त्यांच्याकडे कोणताही निर्गत पास परवाना नसल्याचे आढळून आले. ट्रक आणि माल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.