११७ उपनिरीक्षकांची पदोन्नती रखडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2024 10:48 IST2024-03-03T10:47:53+5:302024-03-03T10:48:27+5:30
येत्या काही दिवसांत पदोन्नतीचे आदेश न निघाल्यास बढत्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकण्याच्या शक्यतेने पोलिस चिंतित आहेत.

११७ उपनिरीक्षकांची पदोन्नती रखडली
नवी मुंबई : राज्यभरातील ११७ पोलिस उपनिरीक्षकांची पदोन्नती दोन महिन्यांपासून रखडली आहे. त्या सर्वांची सहायक निरीक्षक पदावर पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील ऑर्डर काढलेल्या नाहीत. येत्या काही दिवसांत पदोन्नतीचे आदेश न निघाल्यास बढत्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकण्याच्या शक्यतेने पोलिस चिंतित आहेत.
काही वर्षांपासून पोलिसांच्या बदल्या, पदोन्नतीचे आदेश काढण्यात विलंब होताना दिसत आहे. त्यामागचे कारण गुलदस्त्यात असताना पुन्हा एकदा पोलिस उपनिरीक्षकांच्या पदोन्नतीचे आदेश रखडले आहेत. ११७ पोलिस उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षक पदावर बढती मिळणार आहे. त्यासाठी ऑगस्टमध्ये विभागीय पदोन्नती समितीची बैठकदेखील पार पडली. त्यानंतर २८ डिसेंबरला त्यांचे महसुली संवर्ग वाटपदेखील करण्यात आले. दोन महिने उलटूनही अद्यापपर्यंत प्रत्यक्ष पदोन्नतीची ऑर्डर काढण्यात आलेली नाही.