Prefer to go to the village rather than starve in the city | शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावाकडे जाण्याला प्राधान्य  

शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावाकडे जाण्याला प्राधान्य  

 

लोकमत न्यूज नेटवर्क 
कळंबाेली : लॉकडाऊनमुळे पनवेल परिसरातील उद्योगधंदे, बाजारपेठा ठप्प झाल्या आहेत. परिणामी हाताला काम नसल्यामुळे कामगारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. दुकाने त्याचबरोबर इतर काम बंद झाले आहे. काम-धंदा नसल्याने शहरात राहणे सोयीचे होणार नाही. त्यामुळे या ठिकाणी उपाशी जगण्यापेक्षा मूळ गावाकडे परतण्यास कामगारांकडून पसंती देण्यात येत असल्याने रेल्वे, बसस्थानकांतील गर्दी वाढली आहे. 
गत वर्षी मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आले होते. तेव्हा सर्व राज्यासह परराज्यातील वाहतूक सुविधा बंद करण्यात आली  होती. त्यामुळे कामगार वर्ग आपल्या मूळ गावी परतू शकले नाहीत. काहींनी मिळेल ते वाहन पकडून गाव गाठले.  तर काहींनी पायीच गावची वाट धरल्याचे पहायला मिळाले. शहरात राहिलेल्या  कामगारांवर उपासमारीची वेळ ओढावली होती. जवळ असलेली सर्व जमापुंजी संपल्याने पनवेल परिसरात राहून दिवस काढणे मुश्कील झाले होते. उद्योग- धंद्यावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सद्य:परिस्थितीत बिकट बनला आहे. गत वर्षाप्रमाणे यंदाही तीच  परिस्थिती  उद्भवेल या भीतीने कामगार, गरीब मजुरांनी गावी जाण्यासाठी पनवेल शहरातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून पनवेल रेल्वेस्थानक, बसस्थानकात गावी जाणाऱ्या प्रवाशांनी गर्दी कली आहे. शुक्रवारी तर मोठ्या प्रमाणात रेल्वेस्थानकावर गर्दी उसळली होती. दररोज गावी जाणाऱ्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. 
बिहार, उत्तर प्रदेश, घाटमाथ्यावर जाणाऱ्यांची संख्या मोठी 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल, उरण, पेण, अलिबाग, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा एमआयडीसी वसाहत, शिळ फाटा परिसरात काम करणारे बिहार व उत्तर प्रदेशकडील बहुतांश मजूर गावाकडे जाण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकात येत आहेत. 
यात गोरखपूरला जाणा-या मजुरांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर बसस्थानक आणि रेल्वेस्थानकात  घाटमाथ्यावरील लातूर, पुणे, नगर, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ, बुलडाणा येथे जाणारे प्रवासी गर्दी करत आहेत. 
परप्रांतीय बांधव आपल्या कुटुंबासोबत परत गावी जात आहेत. यात  पनवेलहून तर काही ठाणे, मुंबई येथून गावी जाण्यासाठी रेल्वेस्थानकात गर्दी करत आहेत. 

उरण येथे फळ गाड्यावर काम करतो. आता लॉकडाऊनमुळे सर्व बंद करण्यात आले आहे. पुढे आणखी लॉकडाऊन वाढेल याची भीती वाटते आहे. त्यामुळे आता गोरखपूरला  जात आहे.  कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पनवेलला परत येईन.
-सुनील यादव, प्रवासी 
गत वर्षी लॉकडाऊन लागले तेव्हा तळोजा येथे राहण्यास होतो. पण खाण्या-पिण्याचे खूप हाल झाले. उपाशीपोटी काही दिवस झोपलो, तेव्हा जमा झालेला पैसा देखील  संपला होता. परिस्थिती खूप वाईट आली  होती. ती आता येऊ नये या करिता आगोदरच सावध झालेले बरं म्हणून गावी निघालो आहे.  
- अनिल राठोड, प्रवासी 
गत वर्षीच्या लॉकडाऊनमुळे खूप हाल झाले. जाण्यासाठी गाड्या नव्हत्या आणि इतर वाहनाने जाण्यास अव्वाच्या सव्वा पैसे घेतले होते.  तेही महाराष्ट्र सीमेपर्यंत यंदा गाड्या सुरू आहेत. म्हणून लॉकडाऊन पुन्हा वाढण्याअगोदर गाव गाठतो आहे. 
- संजय जयस्वाल, प्रवासी

Web Title: Prefer to go to the village rather than starve in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.