पनवेलमध्ये लवकरच प्री-पेड रिक्षा योजना
By Admin | Updated: October 6, 2016 03:54 IST2016-10-06T03:54:29+5:302016-10-06T03:54:29+5:30
पनवेल रेल्वेस्थानक ए-वन नसल्याने येथे प्री-पेड रिक्षा योजनेला एमएमआरडीएकडून परवानगी मिळूनही रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव फेटाळला होता

पनवेलमध्ये लवकरच प्री-पेड रिक्षा योजना
कळंबोली : पनवेल रेल्वेस्थानक ए-वन नसल्याने येथे प्री-पेड रिक्षा योजनेला एमएमआरडीएकडून परवानगी मिळूनही रेल्वे प्रशासनाने प्रस्ताव फेटाळला होता. मात्र याबाबत आरटीओ, वाहतूक पोलीस, स्थानिक प्रशासन आणि प्रवासी संघाकडून करण्यात आलेल्या पाठपुराव्याची दखल रेल्वेने घेतली आहे. या योजनेकरिता सकारात्मकता दर्शवली असून जागा देण्याची सहमती दिली आहे. त्यामुळे प्री-पेड रिक्षा सुरू करण्यातील सर्व अडथळे दूर झाले आहेत.
पनवेलहून सीएसटी, वडाळा, अंधेरी, ठाणे, डहाणू या मार्गावर उपनगरीय रेल्वे गाड्या धावतात. पनवेल महापालिका झाल्याने आता शहरातील विकासकामांना वेग येणार आहे. त्यानुसार दळणवळणाच्या अत्याधुनिक सोयी - सुविधाही उपलब्ध होणार आहेत. सध्या शहरातील रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे आकारण्यात येते. रिक्षाच्या प्री-पेड सेवेमुळे प्रवाशांना लाभ होईल.
पनवेल रेल्वे, बस स्थानकावर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. याठिकाणी बाहेर गावाहून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन प्री-पेड मीटर सुरू करण्याचा प्रस्ताव पनवेल प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आला होता. हा भाग एमएमआरडीएमध्ये येत असल्याने प्रस्ताव प्राधिकरणाकडे गेला. या कार्यालयाकडून स्थापन समितीने मंजुरीही दिली आहे. त्यानंतर आरटीओकडून जागा व सुविधा देण्याची मागणी रेल्वेकडे करण्यात आली आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने याबाबत सुरुवातीला सकारात्मकता दर्शवलेली नाही. मात्र आता रेल्वे प्रशासनाने योजनेकरिता सहमती असल्याचे पत्र आरटीओला दिले. रेल्वेचे स्थानक प्रबंधक पी.के.सिंग, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डी.के.गुप्ता, मुख्य वाणिज्य निरीक्षक आनंद पाटील यांच्यासह प्रवासी संघाचे पदाधिकारी यांनी संयुक्त सर्व्हे केला. याकरिता रेल्वे जागा, पाणी, तसेच विजेची सोय करून देणार आहे. लवकरच ही योजना सुरू करणे अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.