विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 05:36 IST2025-05-04T05:36:20+5:302025-05-04T05:36:30+5:30
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एका महिन्यात कार्यान्वित होणार असल्याने डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे.

विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ प्राण्यांची बेकायदेशीरपणे उघड्यावर कत्तल होत आहे. यामुळे पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून ते विमानांना धडकण्याची शक्यता आहे. ही भीती लक्षात घेऊन नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानतळ संचालकांना उलवे आणि विमानतळ परिसरातील कत्तलखाने, मांस विक्रेते यांना उघड्यावरील कत्तल बंद करण्यास सांगितले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ एका महिन्यात कार्यान्वित होणार असल्याने डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे. विमानतळाच्या धावपट्टीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या उलवे परिसरात शेळ्या आणि कोंबड्यांच्या होणाऱ्या कत्तलीची तक्रार नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी २४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधानांच्या सार्वजनिक तक्रार पोर्टलद्वारे डीजीसीएकडे केली होती. हे विमान नियमांचे उल्लंघन आहे, ज्यामध्ये कोणत्याही विमानतळाच्या १० किमीच्या परिघात प्राण्यांची कत्तल होऊ नये, असे कुमार यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले आहे.
एरोड्रोम पर्यावरण व्यवस्थापन समिती (एईएमसी)चे प्रमुख असलेले सिडको उलवे नोडचे व्यवस्थापन करते. नॅटकनेक्टच्या तक्रारीला उत्तर देताना डीजीसीएचे संचालक अमित गुप्ता यांनी एरोड्रोम ऑपरेटरला एरोड्रोमच्या परिसरात पक्ष्यांच्या हालचालींना आकर्षित करणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीसह सर्व क्रियाकलाप थांबवण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे.